ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर

बर्मिंगहॅम: दोन वेळच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या पहिल्याच फेरीतून बाहेर पडायची नामुष्की ओढवली आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डॉकवोर्थ लुईस नियमाप्रमाणे ४० धावांनी पराभव झाला.

इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा निर्णय किती योग्य आहे हे ऑस्ट्रेलिया संघाला ५० षटकांत २७७ धावांवर रोखून इंग्लंडच्या गोलंदाजांनी दाखवून दिले. मार्क वूड आणि आदिल रशीद यांच्या माऱ्यासमोर ऑस्ट्रलियाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दोघांनीही प्रत्येकी ४ बळी घेऊन ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखायची जबाबदारी पार पाडली.

ऑस्टेलियाला ७.२ षटकांत ४० धावांची आश्वासक सुरुवात देऊन ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर २१ धावांवर परतला. फिंचने एका बाजूने किल्ला लढवत कर्णधार स्मिथ बरोबर ९६ धावांची अर्धशतकी भागीदारी केली. परंतु त्यालाही या खेळीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाकडून फिंच, स्मिथ आणि हेड यांनी अर्धशतकी खेळी केल्या. ५० षटकांत ऑस्ट्रेलियाचा डाव ९ विकेट्सवर २७७ धावांत संपुष्टात आला.

२७८ धावांच लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात अतिशय खराब झाली. सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर जेसन रॉय ४ धावांवर तर पुढच्याच षटकात हेल्स भोपळाही न फोडता परतला. यानंतर आलेल्या रूटलाही विशेष काही चमक दाखवता आली नाही आणि तो १५ धावांवर हेझलवूडच्या गोलंदाजीवर वेडकडे झेल देऊन परतला.

कर्णधार एओइन मॉर्गन आणि अष्टपैलू बेन स्टोक्सने कधी संयमी तर कधी स्फोटक फलंदाजी करून संघाला विजयपथावर नेले. जिंकण्यासाठी ८४ धावांची गरज असताना मॉर्गन झाम्पाकरावी धावबाद झाला. त्याचे शतक १३ धावांनी हुकले. गोलंदाजीमध्ये ८ षटकांत ६१ धावा देणाऱ्या स्टोक्सने त्याची भरपाई फलंदाजी करताना भरून काढली. ४१ व्या षटकात झाम्पाला चौकार खेचत त्याने आपले शतक साजरे केले.

जिंकण्यासाठी ५८ चेंडूत ३८ धावांची आवश्यकता असताना जोरदार पाऊसामुळे खेळ थांबविण्यात आला. त्यानंतर पाऊसामुळे खेळ पुढे सुरु न राहिल्यामुळे इंग्लंडला डॉकवोर्थ लुईस नियमाप्रमाणे ४० धावांनी विजयी घोषित करण्यात आले.
‘अ’ गटात अव्वल स्थानी असणाऱ्या इंग्लडने सर्व सामने जिंकत ६ गुणांसह उपांत्यफेरीत प्रवेश केला. पाऊसामुळे पहिले दोन सामने खेळायला न मिळालेल्या ऑस्ट्रेलियाला या सामन्यातील पराभवामुळे उपांत्यफेरीपूर्वीच स्पर्धेबाहेर जावे लागले तर ३ गुणांसह बांगलादेश हा पहिला आशियायी संघ उपांत्यफेरीत गेला.