ऍशेस २०१७: पहिल्या दिवशी इंग्लंडची सावध सुरुवात

आज पासून सुरु झालेल्या ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने ८०.३ षटकात ४ बाद १९६ धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना अखेरच्या सत्रात थांबवावा लागला.

तत्पूर्वी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु इंग्लंडला ऍलिस्टर कूकच्या रूपात पहिला धक्का लवकर बसला. कूकला तो २ धावांवर असतानाच मिचेल स्टार्कने पीटर हॅंड्सकोम्ब करवी झेलबाद केले.

त्यानंतर मार्क स्टोनमन आणि जेम्स विन्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२५ धावांची शतकी भागीदारी रचली आणि इंग्लंडचा डाव सावरला. स्टोनमन १५९ चेंडूत ५३ धावांवर खेळत असताना पॅट कमिन्सने त्याला त्रिफळाचित करून इंग्लंडचा दुसरा बळी घेतला. तर विन्सला नॅथन लीऑनने स्टंपवर थेट चेंडू फेकत अप्रतिम धावबाद केले. विन्सने १७० चेंडूत ८३ धावा केल्या. या खेळीत त्याने १२ चौकार मारले.

त्याच्या पाठोपाठ लगेचच इंग्लंड कर्णधार जो रूटलाही कमिन्सने पायचीत केले याबद्दल रूटने डीआरएसची मागणी केली परंतु यातही रूट बाद असल्याचे दिसून आल्याने रूटला १५ धावांवर माघारी परतावे लागले.

दिवसाखेर अखेर डेविड मलान आणि मोईन अली यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. मलान २८ आणि अली १३ धावांवर खेळत आहेत.