Ashes: इंग्लंड पराभवाच्या छायेत, डावाने पराभव टाळण्यासाठी १२७ धावांची गरज

पर्थ। ॲशेस मालिकेत तिसऱ्या सामन्यात इंग्लंड संघ पराभवाच्या छायेत आहे. ऑस्ट्रेलियाने सामन्यावरची पकड आणखी मजबूत केली आहे. चौथ्या दिवसाखेर इंग्लंडने ४ बाद १३२ धावा केल्या आहेत. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने ९ बाद ६६२ धावांवर पहिला डाव घोषित केला.

दुसऱ्या डावात इंग्लंडची पुन्हा एकदा खराब सुरुवात झाली. सलामीवीर ऍलिस्टर कूक(१४) आणि मार्क स्टोनमन(३) यांना लवकर बाद करण्यात हेझलवूडला यश मिळाले. त्यानंतर मात्र तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या जेम्स विन्सने संयमी फलंदाजी करत अर्धशतकी खेळी करून डाव सावरला. परंतु त्याला बाकी फलंदाजांनी हवी तशी साथ दिली नाही.

इंग्लंड कर्णधार जो रूटलाही विशेष काही करता आले नाही. त्याला १४ धावांवर असताना नॅथन लियॉनने स्टिव्ह स्मिथकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याच्या नंतर काही वेळातच मिचेल स्टार्कने एक जबरदस्त चेंडू टाकून विन्सला ५५ धावांवर त्रिफळाचित केले. काही क्रिकॆप्रेमींच्या मते हा चेंडू ॲशेस मालिकेत आजपर्यंतचा सर्वात चांगला चेंडू आहे.

दिवसाच्या अखेरच्या सत्रात पाऊस आल्याने सामना थांबवावा लागला. इंग्लंड अजूनही १२७ धावांनी पिछाडीवर आहे. तसेच पहिल्या डावात शतकी खेळी करणारे डेव्हिड मलान(२८) आणि जॉनी बेअरस्टो(१४) नाबाद खेळत आहेत.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने आज ४ बाद ५४९ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. काल इंग्लंडच्या गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलेल्या स्टिव्ह स्मिथ आणि मिचेल मार्श या दोघांना दिवसाच्या सुरवातीलाच बाद करण्यात जेम्स अँडरसनला यश मिळाले. त्याने उत्तम गोलंदाजी करत दोघांनाही पायचीत बाद केले.

स्मिथने या डावात ३९९ चेंडूत २३९ धावा केल्या. यात त्याने ३० चौकार आणि १ षटकार मारला आहे. तसेच मिचेल मार्शने २३६ चेंडूत १८१ धावा केल्या आहेत. त्याने त्याच्या या खेळीत २९ चौकार मारले.

या दोघांनंतर टीम पेन आणि पॅट कमिन्स यांच्या व्यतिरिक्त बाकी फलंदाजांनी विशेष काही केले नाही. पेनने नाबाद ४९ धावा केल्या. कमिन्सला ४१ धावांवर अँडरसननेच पायचीत बाद केले. अँडरसनने या डावात ११६ धावा देत एकूण ४ बळी घेतले.

अखेर ९ बाद ६६२ धावांवर ऑस्ट्रेलियाने पहिला डाव घोषित करत २५९ धावांची आघाडी घेतली.

संक्षिप्त धावफलक:

इंग्लंड पहिला डाव:सर्वबाद ४०३ धावा
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ९ बाद ६६२ धावा (घोषित)
इंग्लंड पहिला डाव: ४ बाद १३२ धावा
डेव्हिड मलान(२८*) आणि जॉनी बेअरस्टो(१४*) खेळत आहेत.