आॅस्ट्रेलियाचा टीम इंडियावर डकवर्थ लूईसनुसार ४ धावांनी विजय; धवनची अर्धशतकी खेळी व्यर्थ

ब्रिस्बेन। आज( 21 नोव्हेंबर) आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने भारतावर 4 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे 17-17  षटकांचा करण्यात आला होता. त्यामुळे आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 17 षटकात 4 बाद 158 धावा केल्या होत्या आणि भारतासमोर डकवर्थ लूईस नियमानुसार 174 धावांचे आव्हान ठेवण्यात आले आहे होते.

या धावांचा पाठलाग करत असताना भारताचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवनने चांगली सुरुवात केली होती. शिखरने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला होता. परंतू रोहित शर्माने मात्र लवकर विकेट गमावली.  त्याला 7 धावांवर असताना जेसन बेरेनडॉर्फने बाद केले.

त्यानंतर शिखरला केएल राहुलची चांगली साथ मिळाली. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी रचली. पण ही जोडी तोडण्यात अॅडम झम्पा आणि यष्टीरक्षक कोरे अँडरसनला यश आले. झम्पाने टाकलेल्या चेंडूवर अँडरसनने राहुलला(12) यष्टीचीत केले.

राहुलच्या पाठोपाठ भारताचा कर्णधार विराट कोहलीही(4) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर काहीवेळातच अर्धशतकी खेळी करत एकाकी लढत देणारा शिखर धवनलाही बाद करण्यात बिली स्टॅनलेकला यश आले.

शिखरने 43 चेंडूत 77 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 2 षटकार मारले.

शिखर धवन बाद झाल्यानंतर रिषभ पंत आणि दिनेश कार्तिकने आक्रमक खेळ करत भारताला विजयाच्या समीप नेले होते. परंतू भारताला विजयासाठी 9 चेंडूत 18 धावांची गरज असताना पंतने 20 धावांवर असताना विकेट गमावली.

त्यानंतर भारताला शेवटच्या षटकात विजयासाठी 13 धावांची गरज होती. पण या षटकात कृणाल पंड्या(2) आणि कार्तिकने(30) लागोपाठ विकेट गमावल्या. त्यामुळे भारताला 17 षटकात 7 बाद 169 धावाच करता आल्या.

आॅस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉइनिस(2/27), अॅडम झम्पा(2/22), अँड्र्यू टाय(1/47), जेसन बेरेनडॉर्फ(1/43) आणि बिली स्टॅनलेक(1/27) यांनी विकेट घेतल्या.

तत्पूर्वी या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून आॅस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले होते. आॅस्ट्रेलियाकडून डॉर्सी शॉर्ट(7) आणि एॅरॉन फिंच यांनी चांगली सुरुवात केली होती. पण चांगल्या सुरुवातीनंतरही शॉर्टने लवकर विकेट गमावली. शॉर्टला भारताच्या खलील अहमदने त्याच्या पहिलाच चेंडूवर बाद केले.

त्यानंतर फिंच आणि ख्रिस लिनने डाव सावरला होता. पण त्यांची भागीदारी रंगत असतानाच कुलदीप यादवने 27 धावांवर खेळणाऱ्या फिंचला बाद करत आॅस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला.

त्याच्यापाठोपाठ कुलदीपने आक्रमक खेळणाऱ्या ख्रिस लिनलाही स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केले. लिनने 37 धावांची खेळी केली. या तीन विकेटनंतर मात्र आॅस्ट्रेलियाचा डाव अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिस यांनी सांभाळला.

त्यांनी अर्धशतकी भागीदारीही रचली असताना 17 व्या षटकादरम्यान पावसाचा व्यत्यय आल्याने सामना काही काळ थांबवण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा मॅक्सवेल आणि स्टॉयनिस फलंदाजीसाठी आले. पण मॅक्सवेल लगेचच बाद झाला. त्याला बुमराहने बाद केले.

मॅक्सवेल(46) आणि स्टॉइनिस (33*) या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी रचली.

महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा- 

शिखर धवनचा टी२०मध्ये अजब कारनामा, किंग कोहलीही पडला विचारात

किंग कोहलीचं मैदानात जंगी स्वागत, पहा व्हिडीओ

पावसाच्या व्यत्ययानंतर टीम इंडियासमोर १७४ धावांचे आव्हान

टी२०मध्ये अशी वेळ कोणत्याही गोलंदाजावर येऊ नये