वाचा: क्रिकेटच्या नवीन नियमाचा पहिला बळी !

आयसीसीने क्रिकेटमधील नवीन बदललेले नियम २८ सप्टेंबरपासून लागू करण्यात आले. २४ तासातच या नवीन बदललेल्या नियमांचा बळी ऑस्ट्रेलियातील स्थानिक संघ क्वीन्सलँडचा संघ ठरला आहे. क्रिकेटचे हे नियम सर्व स्थरावरील क्रिकेटला लागू करण्यात आले आहेत.

आज ऑस्ट्रेलियातील जेएलटी वनडे स्पर्धेत क्वीन्सलँड बुल्स संघातील मार्नस लबूसचग्ने या क्षेत्ररक्षकाने नवीन नियमांचे उल्लंघन केले. नवीन नियम काय आहे आणि त्या नियम अंतर्गत काय शिक्षा करता येऊ शकते या सर्वचा विचार केल्यानंतर पंचानी संघाला ५ धावांची शिक्षा दिली.

नक्की झाले काय जेएलटी वनडे स्पर्धेच्या सामन्यादरम्यान…

२७व्या षटकात फलंदाज परम उप्पल याने चेंडू मिड ऑफच्या दिशेने मारला, जेथे लबूसचग्ने उडी मारून चेंडू आवडण्याचा प्रयत्न केला, पण त्याला चेंडू आडवता आला नाही. पण त्याने अशी नक्कल केली की चेंडू त्याच्या हात आहे आणि फलंदाजला चकवण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर त्याला लगेचच समजले आणि त्याने फलंदाजाकडे माफी मागण्यासाठी हात वर केला. पण फलंदाजाने लगेचच पंचांकडे तक्रार केली. पंचानी दुसऱ्या पंचांबरोबर चर्चा केली. लगेचच पंचानी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. त्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला ५ धावा देण्यात आल्या.

नक्की नियम काय आहे

एमसीसीच्या ४१.५ नियमानुसार फलंदाजाने चेंडू मारल्यानंतर क्षेत्ररक्षक किंवा गोलंदाजाने शाब्दिक किंवा कुठली ही कृती करून फलंदाजाला विचलित करण्याचा किंवा फसवण्याचा किंवा अडथळा आणणे नियमाप्रमाणे चुकीचे आहे. असे केले तर फलंदाजी करणाऱ्या संघाला धावा बहाल केल्या जातात.