२३० बेरोजगार ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू नोकरीच्या शोधात भारतात?

सध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची संघटना यांच्यात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश क्रिकेटपटू हे भारतात नवीन क्रिकेटमधील संधी शोधत आहेत.
टीम क्रुकशॅन्क जे की ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या संघटनेचे आर्थिक बाबी सांभाळतात ते सध्या भारतात नवीन क्रिकेटमधील संधीच्या शोधात आले आहेत. सध्या सुरु असलेल्या वादामुळे २३० क्रिकेटपटू बेरोजगार आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ” मी सध्या भारतात येण्याचं मुख्य कारण म्हणजे मी इथे काही काही मीटिंगला उपस्थित राहणार आहे. कारण १ जुलै पासून आमच्या खेळाडूंचे करार संपुष्ठात आले आहेत. आमच्या खेळाडूंनी त्यांची बौद्धिक संपत्ती अर्थात intellectual property एसीए अर्थात ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची संघटनाबरोबर करारबद्ध केली आहे. ”

“जी सध्या एसीएमधील क्रिकेटपटूंची ब्रँड विंग संभाळते. त्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक संधी ह्या खेळाडू आणि संघटनेसाठी निर्माण केल्या जातात. ”

ते पुढे असाही म्हणाले की जर खेळाडू हे बोर्ड आणि संघटनेतील वादामुळे बेरोजगार राहिले तर त्यांना दुसऱ्या गोष्टींमधून जर आर्थिक फायदा झाला तर त्याचा त्यांना मोठा हातभार लागेल.

टीम क्रुकशॅन्क यांनी विविध छोट्या मोठ्या कंपनींना भेटी देऊन नवीन करार करण्यासाठी इच्छूक असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून ते एसीए बरोबर संलग्न होण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं आहे. तसेच खेळाडू सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही याचा आर्थिक गोष्टींवर कोणताही परिमाण होणार नसल्याचं सांगितलं आहे.