म्हणून भारत-पाकिस्तान क्रिकेट चाहते आले एकत्र

नवी दिल्ली । भारत-पाकिस्तान क्रिकेटप्रेमींमध्ये जी गोष्ट सहसा पाहायला मिळत नाही ती म्हणजे कोणत्याही गोष्टींवर एकमत होणे. परंतु आजकाल हे चित्र नेहमीच झालं आहे की विराट कोहलीला या देशातून मोठा पाठिंबा मिळत असतो.

विराटाचे असंख्य चाहते पाकिस्तान देशात देखील आहेत. म्हणूनच विराटने वर्ल्ड ११ संघाकडून पाकिस्तान विरुद्ध खेळावे म्हणून पाकिस्तान देशातून मोठे कॅम्पेन चालवले गेले.

परंतु आता एका नवीन घटनेमुळे विराटाचे पाकिस्तान आणि भारतातील क्रिकेट चाहते एकत्र आले आहेत. ऑस्ट्रेलियन पत्रकार डेनिस फ्रिडमॅन यांनी विराट आणि भारतीय संघातील अन्य खेळाडूंचा एक फोटो शेअर करून त्यावर अतिशय चुकीचे कॅप्शन लिहिले.

गेल्या वर्षी भारतीय संघाने स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून कोलकाता इडन गार्डन येथील मैदान साफ केले होते. त्यावेळीचा फोटो डेनिस फ्रिडमॅन या पत्रकाराने शेअर करताना कॅप्शनमध्ये सफाई कर्मचारी वर्ल्ड ११ विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी मैदान साफ करत आहे असे लिहिले आहे.

या घाणेरड्या कॅप्शनमुळे मात्र या ऑस्ट्रेलियन पत्रकाराला दोनही देशांतील चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. याबद्दल अजून कोणत्याही खेळाडूने अधिकृत टिप्पणी केली नसली तरी चाहते मात्र चांगलेच संपप्त झाले आहेत.

दरम्यान पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड ११ यांच्यातील पहिला सामना पाकिस्तान संघाने २० धावांनी जिंकला असून पुढील सामना आज रात्री ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल.