Australian Open 2018: कॅरोलिन वोझनीयाकीने मिळवले पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद

मेलबर्न। ऑस्ट्रेलियन ओपन २०१८ स्पर्धेत महिला एकेरीच्या रंगतदार झालेल्या लढतीत डेन्मार्कच्या कॅरोलिन वोझनीयाकीने अव्वल मानांकित सिमोना हॅलेपला पराभूत करत आपले पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले. तिने २ तास ४९ मिनिटे चाललेल्या या लढतीत ७-६,६-३,६-४ अशा फरकाने विजय मिळवला.

या दोघींमध्येही सुरवातीपासूनच झुंज बघायला मिळत होती. सामन्यातील पहिलाच सेट टाय ब्रेकमध्ये गेला. अखेर द्वितीय मानांकित कॅरोलिन वोझनीयाकीने पहिला सेट जिंकून सामन्यात आघाडी घेतली.

परंतु सिमोनाने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करत ३-२ अशा फरकाने आघाडी घेत ही आघाडी वाढवत नेली आणि या सेटमध्ये ६-३ असा विजय मिळवला. त्यामुळे सामना तिसऱ्या सेटमध्ये गेला. या तिसऱ्या सेटमध्येही दोघींनी आपला अनुभव पणाला लावला होता. अखेर या चुरशीच्या सेटमध्ये वोझनीयाकीने मॅच पॉईंट मिळवत ऑस्ट्रेलियन ओपेनचे विजेतेपद आपल्या नावावर केले.

या लढतीसाठी वोझनीयाकीचे कुटुंबीयही प्रेक्षकांमध्ये हजर होते. तिने सामन्यानंतर तिच्या वडिलांचे आणि प्रियकराचे देखील आभार मानले. ती म्हणाली, मी या क्षणाचे खूप वर्षांपासून स्वप्न पाहत होते. माझा आवाजही थरथरत आहे. माझ्यासाठी हा खूप भावनिक क्षण आहे. मला सर्वांचे आभार मानायचे आहेत. हे दोन आठवडे खूप मस्त होते. ” याबरोबरच तिने सिमोनाचेही अभिनंदन केले.

या दोघींनीही तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठली असून दोघींचीही ऑस्ट्रेलियन ओपेनची अंतिम फेरी गाठण्याची पहिलीच वेळ होती. सिमोनाने या आधी २०१४ आणि २०१७मध्ये रोलँड ग्रँरोस अर्थात फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली होती. तसेच कॅरोलिन वोझनीयाकीने २००९ आणि २०१४मध्ये अमेरिकन ओपनची अंतिम फेरी गाठली होती.