कोहली, अश्विनबरोबर या भारतीय खेळाडूनेही पकडले कौंटी क्रिकेटचे विमान!

भारतीय खेळाडूंचा 2018 च्या कौंटी क्रिकेट मोसमात  खेळण्याकडे चांगलाच ओढा दिसतो आहे.  कर्णधार विराट कोहलीनंतर आता अष्टपैलू अक्षर पटेल यानेही कौंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

अक्षरने कौंटी चॅम्पियनशीपमधील अंतिम सहा सामन्यासाठी दुरहाम या संघाबरोबर करार केला आहे. तो कौंटी क्रिकेटमध्ये ग्लॅमोर्गन विरूद्धच्या सामन्यात पदार्पण करणार आहे. हा सामना 19 ऑगस्टला कार्डीफ येथे होणार आहे.

विराटला बीसीसीआयकडून परवानगी मिळाल्यानंतर त्याने सरे संघाकडून कौंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. विराट आणि अक्षर बरोबरच चेतेश्वर पुजारा यांनी यॉर्कशायर, इशांत शर्मा यांनी ससेक्स तर वरून अॅरोन यांनी लिसेस्टरशायर या संघांबरोबर करार केला आहे.

त्याचबरोबर आर. अश्विन पण मागच्या हंगामात वेस्टरशायर या संघाकडून कौंटी क्रिकेट खेळला होता.

अक्षरने 2012 मध्ये प्रथम श्रेणीत क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. गुजरातकडून खेळताना त्याने 79 विकेट्स घेतल्या आहेत. यात 2015 मध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात भारत अ कडून खेळताना त्याने 14  विकेट्स घेतल्या होत्या.

तो भारताकडून आत्तापर्यंत 49 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यामध्ये त्याच्या 249 धावा आणि 54 विकेट्सचा समावेश आहे. आयपीएलमध्ये किंग्ज इलेवन पंजाबकडून खेळताना अक्षरने 20.20 च्या सरासरीने 606 धावा आणि 26.81 च्या सरासरीने 59विकेट्स घेतल्या आहेत.