आयटीएफ कुमार टेनिस स्पर्धेत एकेरीत रयुही अझूमा, कसीदीत समरेज, सालसा आहेर, पिमरादा जट्टावापोर्नवीत यांचा अंतिम फेरीत प्रवेश

दुहेरीत देव जाविया व मन शहा, ली यु-युन व कोहरू निमी यांना विजेतेपद

पुणे: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) आणिपुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरिन एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात  जपानच्या रयुही अझूमा, थायलंडच्या कसीदीत समरेज यांनी, तर मुलींच्या गटात भारताच्या सालसा आहेर, थायलंडच्या पिमरादा जट्टावापोर्नवीत या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुहेरीत मुलांच्या गटात भारताच्या देव जाविया व मन शहा, जपानच्या ली यु-युन व कोहरू निमी यांनी विजेतेपद पटकावले आहे.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत मुलांच्या गटात जपानच्या सातव्या मानांकित रयुही अझूमा याने भारताच्या अव्वल मानांकित सिद्धांत बांठियाचा टायब्रेकमध्ये 4-6 7-6(0) 7-5 असा पराभव करून दिमाखात अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात थायलंडच्या चौथ्या मानांकित कसीदीत समरेज याने दुसऱ्या मानांकित भारताच्या मन शहाचा 6-2, 6-2असा सहज पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.अंतिम फेरीत रयुही अझूमासमोर कसीदीत समरेजचे आव्हान असणार आहे.

मुलींच्या गटात पाचव्या मानांकित थायलंडच्या पिमरादा जट्टावापोर्नवीत हिने भारताच्या  श्रीवल्ली रश्मीका भामिदिप्तीचा 3-6 6-4 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सहाव्या मानांकित भारताच्या सालसा आहेरने जपानच्या इरीका मतसुदाला 6-1 4-6 6-0असे नमवित अंतिम फेरी गाठली.अंतिम फेरीत सालसाचा सामना पिमरादा जट्टावापोर्नवीत हिच्याशी होणार आहे.

दुहेरीत अंतिम फेरीच्या लढतीत मुलांच्या गटात देव जाविया व मन शहा या जोडीने थायलंडच्या  कसीदीत समरेज व भारताच्या सच्चीत शर्मा यांचा 6-3 2-6 [10-8]असा पराभव करून या गटाचे विजेतेपद मिळवले. मुलींच्या गटात जपानच्या ली यु-युन हिने कोहरू निमीच्या साथीत भारताच्या सालसा आहेर व जपानच्या इरीका मतसुदा यांचा 6-3 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील दुहेरीतील विजेत्या जोडीला करंडक व 75गुण, तर उपविजेत्या जोडीला करंडक व 45गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण डेक्कन जिमखाना क्रीडा समितीचे सदस्य कल्याणराव शेलार आणि स्पर्धा संचालक आश्विन गिरमे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुपरवायझर लीना नागेशकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: मुख्य ड्रॉ(उपांत्य फेरी): मुले:    
रयुही अझूमा(जपान)(7)वि.वि. सिद्धांत बांठिया(भारत)(1) 4-6 7-6(0) 7-5
कसीदीत समरेज(थायलंड)(4)वि.वि.मन शहा(भारत)(2) 6-2, 6-2

मुली:   
पिमरादा जट्टावापोर्नवीत(थायलंड)(5)वि.वि. श्रीवल्ली रश्मीका भामिदिप्ती(भारत) 3-6 6-4 6-3
सालसा आहेर(भारत)(6)वि.वि.  इरीका मतसुदा(जपान) 6-1 4-6 6-0

दुहेरी गट: मुले: अंतिम फेरी: 
देव जाविया/मन शहा(भारत)वि.वि. कसीदीत समरेज(थायलंड)/सच्चीत शर्मा(भारत)6-3 2-6 [10-8]
मुली:   
ली यु-युन/कोहरू निमी(जपान)[3]वि.वि. सालसा आहेर(भारत)/इरीका मतसुदा(जपान)[4] 6-3 6-2