बाबर आझम: पाकिस्तान क्रिकेट संघाचा उगवता तारा

पाकिस्तानी क्रिकेट संघाचे सुगीचे दिवस होते जेव्हा वसीम अक्रम, इंझमाम उल हक, युनूस खान, मिसबाह उल हक, शोएब अख्तर यांसारखे खेळाडू एकतर्फी सामना जिंकायला मागे पुढे पहात नव्हते. मध्यंतरी मात्र अनुभवी खेळाडू वगळता अन्य नवोदितांकडून अपेक्षा ठेवायची म्हणजे जरा जडच जायचं. त्यातच मिसबाह आणि युनूस खानने आंतरराष्ट्रीयब क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, त्यानंतर मात्र नवोदित खेळाडूंची संघात रेलचेल सुरू झाली.

अशावेळी निवड समितीपुढे मोठा पेच निर्माण झाला या अनुभवी खेळाडूंची जागा भरून काढण्यासाठी तोडीस तोड असे खेळाडू हवे. अशातच बाबर आझम हा खेळाडू २०१२ साली झालेल्या अंडर १९ क्रिकेट विश्वचषकामध्ये पाकिस्तान संघाच नेतृत्व करीत होता.

तो त्याचा दुसरा अंडर १९ विश्वचषक होता या अगोदर त्याने २०१० साली सुद्धा पाकिस्तान कडून खेळण्याचा बहुमान मिळवला होता. एवढेच नव्हे तर तो पाकिस्तान अंडर १५ मध्ये पण खेळला होता.

आपसूकच अशा प्रतिभावंत खेळाडूकडे निवड समितीची करडी नजर होती. आणि त्याच्या सय्यमी खेळाने त्याने उपस्थितांना नेहमीच प्रभावित केले. बाबर आझमची नाळ अगदी लहानपणी पासूनच क्रिकेटशी जोडलेली, अकमल बंधूंचा तो चुलत भाऊ आहे त्यामुळे क्रिकेटचे धडे त्याला बालपणीच मिळाले.

×सर्वात जलद १००० धावा काढणारा पाकिस्तानी फलंदाज×

२०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा बाबर आझम सर्वात जलद १००० धावा काढणारा पाकिस्तानी क्रिकेटर आहे. आझमने आत्तापर्यंतच्या त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत ३२ सामन्यात ६ शतके व ६ अर्धशतकांच्या मदतीने १५५८ धावा काढल्या आहेत. यामध्ये ८७.६२ हे त्याचे स्ट्राईक रेट तर ५५.६४ ही त्याच सरासरी राहिली आहे.

कालच श्रीलंकेविरुद्ध खेळताना त्याने आपल्या एकदिवसीय क्रिकेट मधल्या ६ व्या शतकाला गवसणी घातली. त्याच्या १०३ आणि मलिकच्या ८१ धावांच्या जोरावर पाकिस्तानने लंकेचा ८३ धावांनी पराभव केला. या सामन्यात त्याने नंबर ३ च्या फलंदाजाकडून जशी फलंदाजी अपेक्षित होती अगदी त्याच पध्दतीने खेळत संघाची धावसंख्या २९२ पर्यंत पोहचविण्यात मोलाचा वाटा उचलला.

अगदी चौथ्या षटकांत मैदानावर उतरलेल्या आझमने एका बाजूने सावध खेळ केला. त्याने १३१ चेंडूत १०३ धावा केल्या, त्याचबरोबर ६१ चेंडूत ८१ धावा करत शोएब मलिकने त्याची साथ दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अवघे वय वर्ष २२ असताना ६ शतकं म्हणजे खूपच उल्लेखनीय आहे.

आझमचा आज म्हणजेच १५ आॅक्टोंबरला वाढदिवस आहे. जे पाकिस्तानचे नामवंत खेळाडू करू शकले नाहीत ते या पठ्ठ्याने केले आहे. इंझमाम उल हक एकमेव पाकिस्तानी ज्याने १०००० पेक्षा जास्त धावा केल्या त्याच्या सुद्धा नावे २३ वर्षांचा असताना ६ शतक नव्हती फक्त दोनच होती. जावेद मियादाद आणि युनूस खानच तर या वयाच असताना पदार्पण झाले नव्हते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये.

“बाबर आझम खुप प्रतिभावंत खेळाडू आहे, नेहमीच संघाला त्याच्याकडून खूप अपेक्षा असतात आणि तो त्या पूर्ण करतोही.त्याची फलंदाजी जबरदस्त आहे फक्त एकदिवसीय सारखीच कामगिरी त्याने कसोटी क्रिकेट मध्ये करावी”
– मिकी आॅर्थर(हेड कोच पाकिस्तान क्रिकेट टीम)

शोएब मलिकही या खेळाडूची स्तुती करायला मागे पुढे पहात नाही. तो म्हणतो, आझम खरच उत्कृष्ट क्रिकेटर आहे. टीमला आझमकडून खूप अपेक्षा असतात. नेहमी तो अपेक्षेप्रमाणे खेळतोही.
बाबर आझमने अगदी कमी कालावधीतच सर्वांची मने जिंकली आहेत त्यामुळे पाकिस्तानसाठी हा खेळाडू येत्या काळात ध्रुवतारा म्हणून उदयास येणार हे नक्की.

किरण म. शिंदे
(टीम महा स्पोर्ट्स)