पाकिस्तानचा बाबर आझम टी२० फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी

यावर्षीचा क्रिकेटचा आंतराष्ट्रीय मोसम काल संपला आहे. त्यामुळे आज आयसीसीने खेळाडूंची आणि संघाची क्रमवारी जाहीर केली. यात टी२० फलंदाजी क्रमवारीत पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज बाबर आझमने अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

कालच विंडीज विरुद्ध पाकिस्तान यांच्या ३ सामन्यांची टी२० मालिका पार पडली ज्यात पाकिस्तानने ३-० असे निर्विवाद वर्चस्व राखले. या मालिकेत बाबरने अनुक्रमे १७, ९७* आणि ५१ अशा धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याने या मालिकेत ९५ गुणांची कामे करून मॅक्सवेल आणि कॉलिन मुन्रोला मागे टाकले.

बाबरने १० आठवड्यातच टी२० मध्ये दुसऱ्यांदा अव्वल स्थानी झेप घेतली आहे. त्याने याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका संपल्यानंतर २८ जानेवारीला पहिल्यांदा अव्वल स्थान मिळवले होते. याबरोबरच तो मिस्बा उल हाक नंतरचा अव्वल स्थान मिळवणारा पाकिस्तानचा दुसराच फलंदाज बनला होता.

त्याचबरोबर त्याचा संघसहकारी शादाब खान टी२० गोलंदाजी क्रमवारीत १० स्थानांची प्रगती करत दुसऱ्या स्थानी आला आहे. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी आहे. त्याने विंडीजविरुद्धच्या मालिकेत ३ सामन्यात ५ विकेट्स मिळवले आहेत.

विशेष म्हणजे या गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या सात गोलंदाजांपैकी सहा गोलंदाज व्रिस्ट स्पिनर्स आहेत. त्यात फक्त सहाव्या क्रमांकावर असणारा न्यूझीलंडचा मिचेल सॅन्टेनर लेफ्ट आर्म स्पिनर आहे.

तसेच टी२० फलंदाजी क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली ८ व्या स्थानी कायम आहे. तयार गोलंदाजी क्रमवारीत युजवेंद्र चहल तिसऱ्या स्थानी कायम आहे. या दोघांव्यतिरिक्त एकही भारतीय खेळाडूंचा गोलंदाजी आणि फलंदाजी क्रमवारीत पहिल्या दहामध्ये समावेश नाही.