बाल उत्कर्ष सुवर्ण महोत्सवी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २२ मार्चपासून

बाल उत्कर्ष मंडळाच्या विद्यमाने, महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. आणि मुं. शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने आपल्या ” सुवर्ण महोत्सवी वर्षा” निमित्त राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे.

मुंबई लालबाग येथील गणेश गल्ली क्रीडांगणावर दि. २२ ते २५ मार्च २०१८ या कालावधीत होणाऱ्या या कबड्डी स्पर्धेत १६ व्यावसायिक पुरुष संघांना, तर १२ महिला संघांना निमंत्रित केले जाणार आहे.

या स्पर्धेकरिता दोन मॅटची क्रीडांगणे बनविण्यात येणार आहेत.क्रीडा रसिकांकरिता देखील दीड ते दोन हजार क्षमतेची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे.

संघाचा सुवर्ण महोत्सव असल्यामुळे खेळाडूंवर देखील रोख रकमेच्या पारितोषिकांची लयलूट केली जाणार आहे. पुरुषांत अंतिम विजयी होणाऱ्या संघास आकर्षक चषक व रोख रु. एक लाख (₹ १,००,०००/-), तर महिला विजेत्या संघास आकर्षक चषक व रोख रु.एकाहत्तर हजार प्रदान करण्यात येतील.

अंतिम उपविजयी संघांना मात्र दोन्ही गटात समान रोख पारितोषिक देण्यात येईल. चषक व रोख रु पन्नास हजार (₹५०,०००/-),तर दोन्ही गटात उपांत्य उपविजयी सर्व संघांना प्रत्येकी चषक व रोख रु. पंधरा हजार (₹ १५,०००/-) देण्यात येतील.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूस दोन्ही गटात रोख रु. दहा हजार तर चढाई व पकडीच्या उत्कृष्ट खेळाडूस प्रत्येकी रोख रु. पाच हजार देण्यात येतील. शिवाय दिवसाच्या मानकऱ्यास देखील गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेची तयारी जोरात सुरू आहे..