इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीग: बंगळुरू रायनोजचा पुणे प्राईडवर ४२-३८ असा विजय पटकावले जेतेपद

बंगळुरू। विशाल(12 गुण) व अरुमुगम (9 गुण) यांनी चांगला खेळत करत इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीग स्पर्धेत बंगळुरू रायनोज संघाने पुणे प्राईडवर 42-38 असा विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली. विजेत्या संघाला 1.25 कोटी देऊन गौरविण्यात आले.

बंगळुरू येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत बंगळुरू रायनोज व पुणे प्राईड संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. पुणे प्राईड संघाने आक्रमक खेळ करत पहिल्या क्वॉर्टरमध्ये 9 -7 अशी आघाडी घेतली.दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये बंगळुरू रायनोज संघाच्या खेळाडूंनी जोर लावत चमक दाखवली.बंगळुरूच्या चढाईपटूंनी जोरदार खेळ करत क्वॉर्टर 14-6 असे आपल्या नावे केले. मध्यंतराला 21-15 अशी आघाडी घेतली.

तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये देखील पुण्याच्या संघाने आक्रमक खेळ करत पुनरागमन केले. त्यांच्या चढाईपटू व बचावफळीने चमक दाखवत क्वॉर्टर 10-10 असे बरोबरीत राखले. पण, तरीही बंगळुरू संघाने 31-25 अशी आघाडी कायम ठेवली.शेवटच्या क्वॉर्टरमध्ये बंगळुरूच्या खेळाडूंनी चमक दाखवली.पुण्याचा संघ देखील हार मानण्यास तयार नव्हता पुण्याच्या संघाने क्वॉर्टर 13-11 असे आपल्या नावे केले पण, त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.