इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग: बंगळुरू रायनोज संघाचा दिलेर दिल्लीवर ६३-३३ असा विजय, अंतिम फेरीत धडक

बंगळूरु। विशाल (24 गुण) व अरुमुगम (14 गुण) यांनी केलेल्या जोरदार कामगिरीमुळे इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्यसामन्यात बंगळुरू रायनोज संघाने दिलेर दिल्लीवर 63-33 असा विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली.अंतिम फेरीत त्यांचा सामना आता पुणे प्राईड संघाशी होणार आहे. सामन्याच्या सर्वच क्वार्टरमध्ये बंगळुरू संघाने चांगला खेळ करत वर्चस्व प्रस्थापित केले.

बंगळूरु येथे सुरु असलेल्या या स्पर्धेतील दुस-या उपांत्यसामन्यात पहिल्या क्वॉर्टरपासूनच बंगळूरु रायनोज व दिलेर दिल्ली संघांमध्ये चुरस पाहण्यास मिळाली. बंगळुरु संघाकडून अरुमुगम व विशाल यांनी चमक दाखवत पहिले क्वॉर्टर 11-9 असे आपल्या नावे केले. दुस-या क्वॉर्टरमध्ये देखील बंगळूरु संघाने गुणांची कमाई सुरुच ठेवली. यावेळी देखील विशाल व अरुमुगमने आक्रमक चढाया करत गुण मिळवले व दुसरे क्वॉर्टर 24-6 असे आपल्या नावे करत मध्यंतरापर्यंत बंगळूरु रायनोज संघाने 35-15 अशी आघाडी घेतली.

तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये बंगळुरू संघाने आपला हाच फॉर्म कायम ठेवला. त्यांच्या चढाईपटू व बचावफळीने चमक दाखवल्याने बंगळुरू संघाने क्वॉर्टर 9-5 असे आपल्या नावे करत आघाडी 44-20 अशी भक्कम केली. शेवटच्या क्वॉर्टरमध्ये दिलेर दिल्ली संघाने गुणांची कमाई केली. पण, बंगळुरूच्या खेळाडूसमोर त्यांचे काहीएक चालले नाही. बंगळुरू संघाने शेवटच्या क्वॉर्टर 19-13 असे आपल्या नावे करत सामना जिंकला.

अंतिम सामना – पुणे प्राईड विरुद्ध बंगळुरू रायनोज

सामन्यांचे थेट प्रक्षेपण – डी स्पोर्ट्स, डी डी स्पोर्ट्स, एमटीव्ही आणि एमटीव्ही एचडी प्लसवर 8.00 वाजल्यापासून