तब्बल १९९ वन-डे खेळलेला खेळाडू होणार खासदार, कारकिर्द सुरु असताना राजकारणी होणारा पहिला क्रिकेटर

बांगलादेशचा सध्याचा वन-डे कर्णधार मर्शफी मुर्तझा राजकारणात आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे. तो पुढच्या महिन्यात बांगलादेशमध्ये होत असलेल्या  निवडणुकीत सत्ताधारी पार्टी अवामी लीगकडून निवडणुक लढवणार आहे.

मर्शफी हा बांगलादेशचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने वन-डेत ६७ सामन्यात नेतृत्व करताना ३८ विजय संघाला मिळवुन दिले आहेत.

मर्शफीने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला असताना त्याला प्रधानमंत्री असलेल्या शेख हसीना यांनीही परवानगी दिली आहे.

क्रिकेटर्सने यापुर्वीही राजकारणात आपले नशीब आजमावले आहे. भारताप्रमाणेच अनेक देशांत क्रिकेटपटूंनी राजकारणाच्या मैदानात पाऊल ठेवले होते. त्यातील काही यशस्वी झाले तर काही अपयशी.

पाकिस्तानात इम्रान खान हे विश्वचषक विजेते कर्णधार तर सध्या पंतप्रधान आहेत. भारतात नवज्योत सिंग सिद्धू, किर्ती आझादसह अनेक खेळाडू राजकारणात आहेत तर भारतीय उपखंडातील श्रीलंकेतच अर्जून रणतुंगा हे माजी कर्णधार राजकारणात आहेत.

मर्शफी ज्या जिल्ह्यातील आहे तेथूनच निवडणुक लढवणार आहे. जर त्याने ही निवडणुक जिंकली तर क्रिकेट खेळत असतानाच राजकारणी बनलेला तो पहिला क्रिकेटर ठरणार आहे.

तो सध्या केवळ वन-डे क्रिकेट खेळत असून टी२० आणि कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. वन-डे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मर्शफीकडे आहे. तो २०१९ विश्वचषकानंतर निवृत्त होईल असे बोलले जात आहे.