२०१९ विश्वचषकासाठी बांगलादेश संघाची घोषणा, एकही वनडे न खेळलेल्या खेळाडूला मिळाली संधी

30 मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये आयसीसी विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. आता जेमतेम दिड महिन्याचा कालावधी राहिलेल्या या विश्वचषकासाठी 15 जणांचा संघ घोषित करण्याची 23 एप्रिल ही अंतिम तारिख आहे. त्यामुळे आता सहभागी संघांनी 15 जणांचे संघ घोषित करायला सुरुवात केली आहे.

आज(16 एप्रिल) बांगलादेश संघाने या विश्वचषकासाठी 15 जणांचा संघ घोषित केला आहे. या संघात अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसनचे उपकर्णधार म्हणून पुनरागमन झाले आहे. तो मागील काही दिवसांपासून दुखापतींचा सामना करत होता. पण तो विश्वचषकासाठी बांगलादेशच्या संघात असणार आहे.

त्याचबरोबर मश्रफे मोर्तझा हा या संघाचा कर्णधार असणार आहे. तर मोसाद्देक हुसेन आणि अबु जायेद यांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बांगलादेशकडून कसोटी आणि टी20 सामने खेळलेल्या जायेदने अजून वनडे पदार्पण केलेले नाही. तरीही त्याला विश्वचषकासाठी संधी मिळाली आहे.

तसेच बांगलादेशच्या या संघात शाकिब आणि मोर्तझा बरोबरच तमीम इक्बाल, मुशफिकुर रहीम आणि महमुदुल्लाह हे अनुभवी खेळाडू आहेत. याबरोबरच मेहदी हसन, मुस्तफिजूर रेहमान, लिटॉन दास, सौम्य सरकार, मोहम्मद सैफुद्दीन यांनाही 15 जणांच्या संघाच संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर युवा खेळाडूंचेही चांगले संतुलन या संघात आहे.

आत्तापर्यंत या विश्वचषकासाठी बांगलादेश बरोबरच न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत या देशांनी 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. बांगलादेशचा या विश्वचषकातील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 जूनला होणार आहे.

2019 विश्वचषकासाठी असा आहे बांगलादेश संघ – 

मश्रफे मोर्तझा (कर्णधार), तमीम इक्बाल, लिटॉन दास, सौम्य सरकार, मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला, शाकिब अल हसन (उपकर्णधार), मोहम्मद मिथुन, सब्बीर रेहमान, मोसद्देक हुसेन, मोहम्मद सैफुद्दीन, मेहदी हसन मिराज, रुबेल हुसेन, मुस्ताफिजूर रेहमान, अबू जायेद.

महत्त्वाच्या बातम्या –

हे चार गोलंदाज विश्वचषकासाठी भारतीय संघाला देणार नेटमध्ये सराव…

या विश्वचषकात धोनी-दिनेश कार्तिकमुळे होणार एक खास योगायोग