भारताचा पराभव करत बांग्लादेशने पहिल्यांदाच कोरले महिला आशिया चषकावर नाव! 

मलेशियात पार पडलेल्या महिला टी 20 आशिया चषकाचा अंतिम सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. या रोमांचकारी झालेल्या सामन्यात बांग्लादेशने भारतावर 3 विकेटने विजय मिळवत आशिया चषकाचे पहिले विजेतेपद पटकावले.

या सामन्यात भारताने बांग्लादेश समोर विजयासाठी 20 षटकात 113 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बांग्लादेशने चांगली सुरवात केली. सलामीला आलेल्या शामिमा सुल्ताना(16) आणि अयाशा रहमान(17) यांनी चांगली सुरवात करून दिली होती.

या दोघींनाही पूनम यादवने 7 व्या षटकात लागोपाठच्या चेंडूंवर बाद करून बांग्लादेशला धक्का दिला होता. मात्र त्यानंतरही बांग्लादेशच्या फलंदाजांनी चांगली लढत दिली आणि बांग्लादेशला  विजयाच्या समीप नेले.

बांग्लादेशकडून बाकी फलंदाजांपैकी फरगाना हुक(11),निगर सुल्ताना(27), रुमाना अहमद(23), फहिमा खतुन(9), संजिता इस्लाम(5) आणि फरगाना हुक (2*) यांनी धावा करत बांग्लादेशला अखेरच्या चेंडूवर विजय मिळवून दिला.

अखेरच्या चेंडूवर बांग्लादेशला 2 धावांची गरज होती यावेळी फरगानाने या धावा केल्या.  

भारताकडून पूनम यादवने उत्कृष गोलंदाजी केली. तिने 4 षटकात फक्त 9 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच हरमनप्रीत कौरने 2 विकेट घेतल्या.  

तत्पूर्वी, भारताने 20 षटकात 3 बाद 112 धावा केल्या होत्या. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने अर्धशतक करत एकाकी लढत दिली.

तिने 42 चेंडूत 7 चौकारांसह 52 धावांची खेळी केली. मात्र ती डावाच्या अखेरच्या चेंडूवर बाद झाली. भारताच्या अन्य फलंदाजांपैकी मिताली राज(11), वेदा कृष्णमुर्ती(11) आणि झुलन गोस्वामी(10) व्यतिरिक्त एकही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही.

बांग्लादेशकडून खादीजा तुल कुबरा,रुमाना अहमद यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर कर्णधार सलमा खतुन आणि जहांनारा आलम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

क्रिकेटवरील “मुंबई क्रिकेट सफरनामा ” लेखमालिकेतील काही खास लेख-

मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण

– मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- २: मुंबईत कसोटीचे आगमन आणि स्वातंत्र्यपूर्व क्रिकेट

वाचा-

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज