फुटबॉलचे देव अवतरणार मुंबईत, २७ एप्रिलला रंगणार बार्सिलोना आणि युवेंटसमध्ये सामना

मुंबई । आजवर आपण फुटबॉलचे देव फक्त टीव्हीवर पाहिलेत किंवा वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्याबद्दल वाचलेय, पण येत्या 27 एप्रिलला त्याच देवांची पावले भारताची क्रीडा पंढरी म्हणून नावारूपाला येत असलेल्या नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमला लागणार आहेत.

ज्या युरोपियन संघांचा खेळ पाहण्यासाठी आपण भारतीय रात्र-रात्र जागवतो, त्याच बार्सिलोना आणि युवेंटस संघाच्या रथी-महारथी खेळाडूंचा खेळ पाहण्याचे भाग्य मुंबईकरांना लाभणार असल्याची माहिती क्रीडा संघटक आणि डी.वाय.पाटील स्पोर्टस् ऍकेडमीचे सर्वेसर्वा डॉ.विजय पाटील यांनी दिली.

भारत हा क्रिकेटचीच नव्हे तर फुटबॉलचीही फार मोठी बाजारपेठ आहे. भारताचे फुटबॉल भवितव्य फार उज्ज्वल आहे, त्यामुळेच भारतात फुटबॉलची पाळेमुळे खोलवर रूजावी म्हणून सर्वच स्तरावर फार मोठी यंत्रणा सक्रिय झाली आहे.

नुकत्याच झालेल्या फिफा युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारताने दमदार आणि स्फूर्तीदायक कामगिरी करून सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यामुळे भारतात फुटबॉलच्या विकासाला एक वेगळी चालना मिळाली होती.

फुटबॉलची केझ वाढावी म्हणून आता फुटबॉल नेक्स्ट फाऊंडेशनचे संस्थापक कौशिक मौलिक यांनी भारतात फुटबॉलच्या देवांना खेळविण्याची आपली कल्पना प्रत्यक्षात साकारली आहे.

मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे पाठबळ आणि डॉ.विजय पाटील यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे नवी मुंबईच्या क्रीडा पंढरीत स्पेनचा अव्वल संघ बार्सिलोना आणि इटालियन फुटबॉलची जान असलेल्या युवेंटस या दोन्ही युरोपियन संघांच्या माजी दिग्गजांना खेळविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे.

सामना नव्हे संस्मरणीय अनुभव
हा केवळ एक सामना नसून हा भारतीय क्रीडा विश्वासाठी एक संस्मरणीय अनुभव ठरणार आहे. माझ्यासाठी हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षणांपैकी एक आहे.

डी.वाय.पाटील स्टेडियम उभारल्यानंतर या स्टेडियममध्ये भारतातील सर्व क्रीडा प्रकार इथे खेळले जावे, हे माझे स्वप्न होते. आपल्या स्टेडियमवर आयपीएलच्या दोन स्पर्धा झाल्या.

नुकताच फुटबॉलच्या विश्वचषक स्पर्धेच्या लढती झाल्या. आता फुटबॉलच्या देवांचा खेळ पाहण्याची संधी मुंबईकर-नवी मुंबईकरांना आम्ही देतोय. फुटबॉलच्या विविध लीगसाठी रात्र जागवणारे भारतीय फुटबॉल चाहते या देवदर्शनासाठीही प्रचंड गर्दी करतील हा माझा विश्वास आहे.

भारतीय फुटबॉलमध्ये अशा प्रकारचा सामना पहिल्याच होत असल्यामुळे क्रीडा पंढरीत फुटबॉल भक्तांचा सागर उसळणार हे निश्चित आहे.

मेस्सीकडून आदित्य ठाकरेंना जर्सी भेट
लवकरच बार्सिलोनाचे दिग्गज भारत भेटीवर येत आहेत. पण त्यापूर्वी हा संस्मरणीय सामना आयोजित करण्यासाठी पुढाकार घेणाऱया मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना प्रेमाचे प्रतिक म्हणून फुटबॉल स्टार लिओनल मेस्सीने आपला आटोग्राफ असलेली बार्सिलोना क्लबची जर्सी पाठवली आहे. आज ती जर्सी आदित्य ठाकरेंच्या अनुपस्थितीत डॉ.विजय पाटील यांनी स्वीकारली.

या रे या… सारे या…
फुटबॉल विश्वचषकाच्या सामन्याला मुंबईकरांची अभूतपूर्व गर्दी लाभलेली. तेव्हा फक्त फुटबॉल होत होता म्हणून मुंबईकरांनी गर्दी केली होती आणि आता तर फुटबॉलचे स्टार येणार आहेत. मुंबईकरांसाठी, फुटबॉलप्रेमींसाठी याची देही याची डोळा पाहण्यासारखा अनुभव आहे. मुंबईकरांनो येत्या27 एप्रिलला फुटबॉलचा हा सामना पाहण्यासाठी यावे,सर्वांनी यावे असे आवाहन करताना आदित्य ठाकरे यांनी केले.

एक स्वप्नपूर्ती- मौलिक
गेले नऊ महिने मी या सामन्याच्या आयोजनासाठी प्रयत्न करत होतो. भारतात फुटबॉलचे कोट्यावधी चाहते आहेत. याची सर्वच युरोपियन फुटबॉल क्लब आणि खेळाडूंना कल्पना आहे.
त्यामुळे भारतात सामना आयोजनाची कल्पना छेडताच अनेक क्लबने मला तात्काळ होकार दर्शवला. दहा वर्षापूर्वी मी जर्मनीच्या बायर्न म्युनिच संघाला कोलकात्यात आणले होते. पण भारतात फुटबॉलची केझ निर्माण करायची असेल तर स्वप्ननगरी मुंबईत काहीतरी भन्नाट आणि अद्भूत करावे, असे मी स्वप्न उराशी बाळगले होते.

त्यादृष्टीने मी कामालाही लागलो. मला युरोपियन क्लबकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, पण सामना आयोजनाच्या काही तांत्रिक अडचणींमुळे मला काही काळ प्रतिक्षा करावी लागली. मात्र माझी कल्पना मी जेव्हा आदित्य ठाकरे यांना ऐकविली तेव्हा या क्रीडावेड्या माणसाने मला जे सहकार्य केले त्याचे मी शब्दांत वर्णन करू शकत नाही.

आदित्य ठाकरे यांनी खांद्यावर हात ठेवताच माझ्या अनेक अडचणी दूर झाल्या आणि त्यानंतर विजय पाटिल यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे युरोपियन स्टार क्लबचा सामना खेळविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाल्याचे फुटबॉल नेक्स्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष कौशिक मौलिक यांनी सांगितले.

कोण कोण येणार आहेत…
बार्सिलोना आणि युवेंटस या क्लबच्या दिग्गजांचा संघ असल्यामुळे या दोन्ही संघांत फार मोठी नावे आहेत. यात फिफा विश्वचषकात खेळलेले अनेक दिग्गजही आपले पदलालित्य दाखविण्यासाठी सज्ज करीत आहेत.

यात बार्सिलोना संघात डेव्हिड ट्रेझग्युट, एडगर डेव्हिड,पाओलो मोण्टेरो, मार्क लुलिआनो, फॅब्रिझिओ रावानेलीसारखे अनेक स्टार खेळणार आहेत. तसेच युवेंटसमधून युआन कार्लोस रॉड्गेज, जुलिओ सालिनास, जोस एडमिलसनसह अनेक दिग्गज मुंबापुरीत येतील.