La Liga: मेस्सी आणि सुवारेजच्या गोलच्या जोरावर बार्सिलोना ला लीगाच्या गुणतालिकेत अव्वल

आज झालेल्या ला लीगाच्या १५व्या आठवड्याच्या शेवटच्या सामन्यात बार्सिलोनाने विल्रारियलचा ०-२ ने पराभव करत पुन्हा एकदा विजयी लय प्राप्त केली. मागील २ लीग सामने ड्राॅ झाल्या नंतर हा विजय बार्सिलोनाच्या संघासाठी आवश्यक होता.

या विजयासह बार्सिलोनाने लीग मध्ये आपले पहिले स्थान कायम ठेवत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वॅलेन्सिया मधला ५ गुणांचा फरक कायम ठेवला तर पारंपारिक प्रतिस्पर्धी रियल मॅड्रिड बरोबरचा ८ गुणांचा फरक कायम आहे.

त्याआधी सामन्याच्या सुरुवातीपासुन बार्सिलोनाने सामन्यावर आपला दबदबा कायम ठेवला. दोन्ही संघांना काही संधी मिळाल्या पण त्याचे रुपांतर गोल मध्ये दिसले नाही. मेस्सी आणि अल्बाने डाव्या बाजूने काही उत्तम चाली रचल्या पण सगळे प्रयत्न अयशस्वी झाले.

पहिला हाफ ०-० असा बरोबरीत सुटला. मेस्सी आणि अल्बाचे डाव्या बाजूने गोल करायचे प्रयत्न या पुर्ण मौसमात बार्सिलोनाची एक जमेची बाजु आहे. दुसऱ्या हाफच्या ६० व्या मिनिटला बार्सिलोनाच्या सर्जी बुस्केटवर केलेला डॅनी राबाचा टॅकल त्याला चांगलाच महागात पडला रेफ्रीने रेड कार्ड दाखवत त्याला सामन्यातून बाहेर काढले.

१० खेळाडूंनी खेळणाऱ्या विल्रारियलसमोर बार्सिलोनाला रोखणे जवळजवळ अशक्य दिसत होते आणि अवघ्या १२ मिनिटानंतर मेस्सी, सुवारेज आणि पॅकोच्या त्रिकुटाने संधी निर्माण केली. पॅकोच्या असिस्टवर सुवारेजने गोल करत ०-१ ने बढत मिळवून दिली.

१० मिनिटानंतर ८३ व्या मिनिटला बुस्केटच्या पासवर मेस्सीने २ डिफेंडर्सला चकवत गोल केला आणि बार्सिलोनाला ०-२ ने विजय मिळवून दिला. या विजयात सर्वात मोठा हात हा गोलकीपर टेर स्टेगनचा होता त्याने ३ अप्रतिम गोल वाचवत विल्रारियलचा स्कोर शुन्यच ठेवला.

मेस्सीचा गोल हा बार्सिलोनासाठीचा ५२५ वा गोल होता. या गोल बरोबरच त्याने बायर्नच्या मुलरचा टाॅप ५ युरोपच्या लीग मध्ये एका क्लब तर्फे केलेल्या सर्वाधिक गोल्सच्या विक्रमाची बरोबरी केली.

संपुर्ण फुटबाॅल जगतात एका क्लब तर्फे सर्वाधिक गोल्सचा विक्रम पेलेच्या नावावर आहे. पेलेने सॅंटोस या क्लब कडुन ६४३ गोल्स नोंदवले आहेत.

नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)