चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार- बार्सेलोना विरुद्ध जुवेन्टस आज लढत

बार्सेलोना फुटबॉल संघ यंदाच्या युएफा चॅम्पियन ट्रॉफीच्या मोसमाची सुरुवात आज मध्यरात्री पासून करणार आहे. बार्सेलोनाचा सामना मागील चॅम्पियन ट्रॉफीतील उपविजेता संघ जुवेन्टस यांच्या विरुद्ध होणार आहे. जुवेन्टस संघाने मागील मोसमात बार्सेलोना संघाला हरवत चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर जाण्यास भाग पडले होते.

बार्सेलोना आणि जुवेन्टस हे दोन्ही संघ त्यांच्या लीगमध्ये सध्या चांगल्या लयीत आहेत. ‘ला लीगा’ मध्ये बार्सेलोना फुटबॉल संघ आघाडीवर आहे. जुवेन्टस इटली मधील ‘सिरीज ए’ स्पर्धेत अव्वल स्थानावर आहे. जुवेन्टसने मागील तीन सामन्यात १० गोल केले आहेत. या संघाचा मुख्य स्ट्रायकर पाउलो डिबाला हा उत्तम लयीत असून त्याने तीन सामन्यात ५ गोल केले आहेत. काही मुख्य खेळाडू जखमी असल्याने या संघाचा डिफेन्स थोडा कमकुवत भासतो आहे. मागील मोसमातील जशी कामगिरी या संघाच्या डिफेन्सने केली होती त्या प्रकारच्या कामगिरीची ते पुनरावृत्ती करतील असे वाटत नाही.

बार्सेलोना संघ ला लीगा मध्ये उत्तम कामगिरी करत आहे. या संघाने ला लीगामधील मागील तिन्ही सामने जिंकले आहेत. या संघाने या तिन्ही सामन्यात मिळून ९ गोल केले आहेत तर एकही गोल स्वीकारला नाही. या संघाच्या डिफेन्सने या मोसमात उत्तम कामगिरी केली आहे. जेराड पिके आणि सॅम्युएल उटीटी हे बार्सेलोनाच्या डिफेन्समध्ये उत्तम कामगिरी बजावत आहेत. लिओनला मेस्सी,इवान रॅकिटीक ,इनिएस्टा ,सुआरेज उत्तम खेळ करत आहेत.

मेस्सीने मागील सामन्यात हॅट्रीक नोंदवली होती.लीगमधील तीन सामन्यात त्याने ५ गोल केले आहेत. मेस्सीला विंग्जवर न खेळवत सेंटर फॉरवर्ड खेळवण्याचा बार्सेलोनाच्या प्रशिक्षक एर्नस्टो वेल्वर्द यांचा निर्णय योग्य ठरत आहे. मेस्सीला रोखण्यासाठी जुवेन्टस संघाच्या खेळाडूंना विशेष कामगिरी करावी लागणार आहे.

बार्सेलोना संघाचा सर्जिओ रॉबर्टो या सामन्यासाठी संघात सामील होईल. मागील काही सामान्यांत तो जखमी असल्याने खेळला नव्हता. जुवेन्टस संघाचा मुख्य गोलकीपर बुफॉन या सामन्यात परतेल अशी अशा आहे. त्याला सिरीज ए मधील मागील सामन्यात विश्रांती दिली गेली होती.

जर तुम्हाला माहिती नसेल तर-
# बार्सेलोना संघाचा मुख्य स्ट्रायकर लियोनेल मेस्सी याला एकदाही जुवेंटसच्या गोलकीपर बुफॉन याला चुकवून गोल करता आला नव्हता. यामुळे मेस्सी बुफॉनच्या विरुद्ध गोल करू शकतो का नाही. याकडे सर्व फुटबॉल रसिकांचे लक्ष्य लागून आहे.