बार्सेलोना कायम राखणार का विजयी लय ?

ला लिगामध्ये आज बार्सेलोना संघाचा सामना गताफे सीएफ या संघाशी होणार आहे. ला लीगमध्ये बार्सेलोना संघ पहिल्या क्रमांकावर आहे. या संघाने नवीन मोसमात खेळलेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांनी मागील तीन सामन्यात एकही गोल स्वीकारला नाही हे विशेष.

बार्सेलोना संघासाठी लियोनेल मेस्सी, रॅकीटिक, इनिएस्टा आणि गोलकीपर मार्क टेर स्टेगन उत्तम कामगिरी करत आहेत. डिफेन्समध्ये जेराड पिके,बुस्केट, सॅम्युअल उटीटी हे चांगली कामगिरी करत आहेत. या मोसमात नेमारच्या ट्रान्सफरनंतर लेफ्ट विंग जागेसाठी घेण्यात आलेला डेम्बले या संघासोबत जुळवून घेण्यात लवकर यशस्वी झाला आहे.

लियोनेल मेस्सी सध्या उत्तम लयीत असून त्याने ला लिगामधील मागील सामन्यात हॅट्रीक लगावली होती.त्याचबरोबर १२ सप्टेबर रोजी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात त्याने जुवेंतूस सारख्या तंगड्या संघाविरुद्ध २ गोल केले होते. त्यामुळे त्याला रोखणे गताफे संघाला थोडे अवघड जाईल असे वाटते.

गताफे संघ ला लीगमध्ये सध्या ११व्या स्थानावर आहे. या मोसमात खेळलेल्या तीन सामन्यात त्यांनी एका सामन्यात विजय, एका सामन्यात पराभव तर एक सामना बरोबरीत राखण्यात यश मिळवले आहे. त्यांनी या तीन सामन्यात दोन गोल केले आहेत तर तेवढेच गोल स्वीकारले देखील आहे. गताफे या संघाने मागील काही वर्षे सतत बार्सेलोना संघासमोर प्रश्न उपस्थित केल्याने हा सामना चुरशीचा होईल असे वाटते. बार्सेलोला संघ पेप गार्डिओला प्रशिक्षक असताना अपराजित संघ असल्यासारखा खेळायचा त्याकाळात देखील गताफे संघाने बार्सेलोना संघाला चांगली टक्कर दिली आहे.

या सामन्यात बार्सेलोना संघ विजयाचा प्रबळ दावेदार असणार आहे. या दोन संघातील मागील सामने संघर्षपूर्ण झाले असले तरी बार्सेलोना संघाची सध्याची विजयी लय पाहता ते या सामन्यात  विजय मिळवून पूर्ण तीन गुण मिळवतील असे वाटते.

यदाकदाचित तुम्हा माहिती नसेल तर-

#१ गताफे संघाने २००७ साली कोपा देल रिओ स्पर्धेच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात बार्सेलोना संघाला ४-० असे हरवले होते.

#२ १७ एप्रिल २००७ रोजी गताफे विरुद्ध खेळताना लियोनेल मेस्सीने दिएगो मॅराडोनाच्या ‘गोल ऑफ सेंचुरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोलला साम्य असणारा गोल केला होता. त्याला अनेक जाणकार मेस्सीचा सर्वोत्कृष्ठ गोल संबोधतात.

#३ कोणतीही स्पर्धा खेळताना बार्सेलोना संघाने मागील चार सामन्यात एकही गोल स्वीकारला नाही.