बार्सिलोनाने केला कोपा डेल रे आपल्या नावे

काल मध्यरात्री माद्रिद येथे झालेल्या कोपा डेल रे चषकाच्या अंतिम सामन्यात बार्सेलोना संघाने अल्वेस संघाचा ३-१ असा पराभव करत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवले. स्पेनमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या या चषकाला किंग्स कप म्हणूनही ओळखतात.

सामना सुरवातीपासूनच दोन्ही संघानी सामन्यावर पकड मजबूत करण्याजोर लावला. सामन्याच्या १४ व्या मिनिटाला विरोधी संघाच्या खेळाची लय मोडण्याच्या प्रयत्नात हेडर करताना बार्सेलोनाचा डिफेंडर झेवियर मॅस्क्रॅनो जखमी झाला आणि त्याच्यावर सामना सोडून जाण्याची वेळ आली. ३० व्या मिनिटाला नेमार आणि मेस्सी यांनी ड्रिबल करत बॉल विरोधी संघाच्या बॉक्स मध्ये नेला आणि मेस्सीने डाव्या पायाने सुंदर शॉट गोल पोस्टच्या डाव्या बाजूच्या वरील कोपऱ्यात प्लेस करत बार्सेलोनासाठी अंतिम सामन्यातील पहिला गोल केला. मेस्सीचा सीज़न मधील हा ५४ वा गोल होता. संघाला त्याने १-० अशी बढत मिळवून दिली.

पहिल्या गोल नंतर बार्सेलोना संघाचा खेळ थोडा संथ झाला.अल्वेस संघाला एक फ्री किक मिळाली आणि त्याचा फायदा उठवत थीओ हेर्नन्डेज याने फ्री किक वर गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला.

सामन्याच्या ४५ व्या मिनिटाला नेमारने बार्सेलोनासाठी गोल केला.महान खेळाडू पुकास यांच्या नंतर सलग तीन वर्षे अंतिम सामन्यात गोल करणारा नेमार पहिला खेळाडू बनला. त्याने २०१५, २०१६ आणि २०१७ या तिन्ही वर्षीच्या अंतिम सामन्यात गोल केले आहेत.

पहिल्या हाफच्या खेळात पंचांनी तीन मिनिटाचा अतिरिक्त वेळ दिला आणि मेस्सीने हाफ मधून बॉलवर ताबा घेत चौघा पाच जणांना चकवून बॉल बॉक्स मध्ये आणला आणि लुईस सुवारेजच्या जागी खेळणाऱ्या पॅको असेसरला पास दिला आणि त्याने संधीचे सोने केले आणि सामन्याचा पहिल्या हाफमध्ये बार्सेलोनाला ३-१ बढ़त मिळवून दिली.

सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये आणखी गोल करण्याच्या दोन्ही संघाने संधी बनविल्या पण गोल करण्यात अपयश आले आणि अंतिम सामना बार्सेलोना संघाने जिंकत सलग तिसऱ्यावेळेस चषकवर आपले नाव कोरले. त्यांनी विक्रमी २९ वेळा हा चषक जिंकला आहे.

बार्सेलोना संघाचे कोच लुईस एंरिके यांचा बार्सेलोना संघा सोबतचा करार समाप्त झाला. त्यांनी करार वाढविण्याच्या प्रस्तावाला नकार दिल्यामुळे त्यांचा बार्सेलोना संघासठीचा विदाईचा सामना होता आणि त्यांना या चषकासोबत एक सुरेख बक्षीस मिळाले असे म्हणता येईल.