धोनीने माझ्या गोलंदाजीवर यष्टिरक्षण करावे हे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते- बासिल थंपी !

भारत आणि श्रीलंका संघात २० डिसेंबर पासून ३ सामन्यांची टी २० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच भारताचा संघ जाहीर करण्यात आला. भारतीय संघात बासिल थंपी, वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक हुडा या तरुण खेळाडूंची प्रथमच निवड झाली आहे.

यावर्षीच्या आयपीएलचा ‘इमर्जिंग प्लेअर’ पुरस्कार मिळवणारा थंपी त्याच्या भारतीय संघातील निवडीनंतर बोलत होता. तेव्हा तो भारताचा महान यष्टीरक्षक एम एस धोनीविषयी म्हणाला, “मी गोलंदाजी करत असताना धोनीने यष्टिरक्षण करावे हे माझे खूप दिवसांचे स्वप्न आहे.”

याबरोबरच त्याच्या भारतीय संघातील निवडीबद्दल सांगताना तो म्हणाला, ” मला खूप अभिमान आणि आनंद वाटत आहे. पण माझ्यासाठी हा आश्चर्याचा धक्का होता. मला माझ्या निवडीविषयी केरळ क्रिकेट असोसिएशनचे सचिव जयेश जॉर्जयांच्या कडून कळाले. माझ्यासाठी तो खूप छान क्षण होता. भारताकडून खेळण्याचे तर माझे स्वप्न होतेच.”

थंपीने ऑस्ट्रेलियाच्या महान गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ यांचेही त्याच्या यशात योगदान असल्याचे सांगितले आहे. त्याने चेन्नईतील एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये प्रशिक्षण घेत असताना मॅकग्राथ यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आहे.

सध्या थंपी केरळ संघाकडून रणजी ट्रॉफीत खेळत आहे. केरळचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना विदर्भ संघाविरुद्ध सुरु आहे. थंपीने रणजी स्पर्धेतही चांगली कामगिरी केली आहे. तसेच तो भारत अ संघातूनही न्यूझीलंड विरुद्ध खेळला आहे.