जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट बोर्डावर नामुष्की, बीसीसीआयचं डोमेन लिलावाला उपलब्ध!

क्रिकेट जगतात सर्वात श्रीमंत समजले जाणारे बीसीसीआयवर मोठी नामुष्की ओढवली आहे. वेबसाईटच्या डोमेनचे वेळेत नूतनीकरण झाले नसल्याने त्यांची वेबसाईट आज बंद आहे.

त्यांच्या या वेबसाईटला register.com आणि namejet.com ने विकत घेऊन वेबसाईटच्या डोमेनला लिलावासाठी ठेवले आहे. या डोमेनसाठी आत्तापर्यंत सात बोली लागल्या आहेत यात २७० अमेरिकन डॉलर्स ही सर्वाधिक बोली आहे.

या वेबसाईटचे डोमेन २ फेब्रुवारी २००६ ते २ फेब्रुवारी २०१९ पर्यंत वैध होते. पण ३ फेब्रुवारी २०१८ ही डोमेनला नूतनीकरण करण्याची तारीख होती. पण हे नूतनीकरण न झाल्याने बीसीसीआयची वेबसाईट आज बंद झाली.

बीसीसीआयची वेबसाईट ही भारताच्या आणि देशांतर्गत सामन्यांचे स्कॉरबोर्ड बघण्यासाठी आणि बीसीसीआय बोर्डाच्या कामकाज आणि काही महत्वाच्या बातम्यांसाठी महत्वाची ठरत आहे. पण आता वेबसाईट बंद असल्याने बीसीसीआयसाठी समस्या उद्भवली आहे. त्यातच आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना होता आणि याच दिवशी वेबसाईट बंद आहे.

बीसीसीआयला आयसीसीकडून ४०५ मिलियन अमेरिकन डॉलर्स इतका महसूल मिळतो. तसेच सप्टेंबरमध्ये बीसीसीआयने २.५५ बिलियन अमेरिकन डॉलर्सला स्टार स्पोर्ट्सला आयपीएलचे मीडिया हक्क दिले आहेत असे असतानाही वेबसाईटचे नूतनीकरण करण्यात बीसीसीआय अपयशी ठरली आहे.

विशेष म्हणजे हे डोमेन २०१०मध्ये आयपीएलचे अध्यक्ष ललित मोदी यांनी विकत घेतले होते.