यापैकी एक असू शकते चेन्नईचे नवे घराचे मैदान

आयपीएलमध्ये दोन वर्षांच्या बंदी नंतर दमदार पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स समोर नवे संकट उभे राहिले आहे. चेन्नई संघाच्या चेन्नईतील सामन्यांवरच गदा आली आहे.

आयपीएलचे चेन्नईमधील सर्व सामने दुसरीकडे हलविण्यात येणार आहे. आयपीएलच्या निषेधासाठी कावेरी आंदोलकांनी सामन्यात केलेल्या प्रकारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

चेन्नईत कालच २ वर्षांनंतर पहिल्यांदा क्रिकेटचा सामना झाला होता. त्यामुळे ही बाब चेन्नई सुपर किंग्जच्या संघासाठी आणि चाहत्यांसाठी निराश करणारी आहे. काल झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यात क्षेत्ररक्षकावर कावेरी आंदोलकांनी बुटे फेकली होती.

ही बुटे चेन्नईच्या रवींद्र जडेजा आणि फाफ डुप्लेसिसच्या दिशेने आली. ही घटना कोलकाता संघाची फलंदाजी चालू असताना ८ व्या षटकात घडली. जडेजा क्षेत्ररक्षणासाठी लॉन्गऑनला उभा असताना त्याच्या दिशेने बूट आला. तसेच बाउंड्रीच्या दोरीच्या इथे आलेला बूट फाफ डुप्लेसिस आणि लुंगी इंगिडीने चुकवला.

यासाठीच या सामन्याच्या सुरक्षेसाठी ४ हजार पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण तरीही सामन्यादरम्यान असा लाजिरवाणा प्रकार घडला होता.

याप्रकारावर रजनीकांत यांनी त्यांचे कठोर विचार व्यक्त केले आहेत. ” आयपीएलच्या निषेधासाठी कावेरी आंदोलकांमधील ज्यांनी हा प्रकार केला त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी. हिंसा हा काही त्यावरील तोडगा नाही “, असे अभिनेता आणि राजकारणी रजनीकांत म्हणाले.

तामिळनाडूमध्ये सध्या कावेरी पाणी प्रश्न तापला आहे. म्हणुनच येथे कावेरी संघटनेच्या स्थापनेच्या मागणीसाठी अनेक राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे राज्यातील रस्ते आणि रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली आहे.

या सर्व गोष्टी लक्षात घेता चेन्नईत होणारे सामने दुसरीकडे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ह्या सामन्यांसाठी विशाखापट्टनम, पुणे, राजकोट आणि त्रिवेंद्रम यांच्यापैकी एक हे चेन्नई संघासाठी त्याचे घराचे मैदान म्हणून निवडले जाण्याची शक्यता आहे.