कुंबळेच्या वाढदिवसाच्या पोस्टवरून वाद, बीसीसीआयने काढून टाकली पोस्ट

नवी दिल्ली । भारताचा दिग्गज गोलंदाज आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी एक पोस्ट बीसीसीआयच्या ट्विटर हॅन्डल वरून आज सकाळी करण्यात आली होती पण आता ती पोस्ट काढण्यात आली आहे.

भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळेने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. जगातील सर्वोत्तम लेग स्पिनरपैकी एक असलेल्या अनिल कुंबळेसाठी बीसीसीआयने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘भारताचा माजी गोलंदाज’ असा उल्लेख केला. क्रिकेटप्रेमींना वर्गाला ही गोष्ट आवडली नाही आणि त्यांनी बीसीसीआयला ट्विटरवर जाब विचारला.

याचाच परिणाम की काय बीसीसीआयने सकाळी १० वाजून ५६ मिनिटाने टाकलेली पोस्ट काढून टाकली आणि एक नवीन पोस्ट लिहिली ज्यात कुंबळेचा उल्लेख माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू म्हणून करण्यात आला आहे.

नवीन ट्विटमध्ये देखील कुंबळेला फक्त माजी कर्णधार म्हटले आहे. त्यात त्याला माजी प्रशिक्षक न म्हटल्यामुळे पुन्हा चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

बीसीसीआयला अनेक ट्विट्स आले ज्यात कुंबळेला दिलेल्या शुभेच्छांवरून क्रिकेटप्रेमींनी हल्लबोल केला. नंतर जेव्हा बीसीसीआयने आधीचा ट्विट डिलीट करून पुन्हा नवीन शुभेच्छांचा ट्विट केला तेव्हा चाहत्यांचे आलेले हे रिप्लाय…

लॉर्डस क्रिकेट मैदानाच्या ट्विटर अकाउंटवरूनही कुंबळेला खास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यात कुंबळेचा लॉर्ड्सवरील एक खास विडिओ शेअर करण्यात आला आहे.

अनिल कुंबळेने १३२ सामन्यात ६१९ विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १४ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. अनिल कुंबळे हा कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या २ गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच बरोबर निवृत्ती नंतर त्याने जवळजवळ १ वर्ष भारताचे प्रशिक्षक पदही सांभाळले.

एवढे सर्व विक्रम करणाऱ्या खेळाडूचा उल्लेख बीसीसीआय भारताचा माजी गोलंदाज असे कसे करू शकते ? याचे प्रमुख कारण बीसीसीआय, विराट कोहली आणि प्रशिक्षक पदाचा झालेला वाद आहे का ?