म्हणून विराटला नोकरी सोडावी लागणार !

मुंबई:  भारतीय क्रिकेट संघाचा सर्व प्रकारातील कर्णधार विराट कोहलीला लवकरच ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थातच ओएनजीसीमधील नोकरी सोडावी लागणार आहे. विराट ओएनजीसीमध्ये मॅनेजर पदावर आहे.

ही नोकरी तो स्वतः सोडणार नसून त्याला तसे बीसीसीआयचे आदेशच आहेत. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी बीसीसीआयमधील ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ च्या मुद्द्यावर जोरदार टीका करून सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर नेमलेल्या क्रिकेट प्रशासक समितीमधून माघार घेतली. त्यांनतर ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ विषयावर बीसीसीआयने काही नियम आखून दिले आहेत.

या नियमांचा फटका यापूर्वी सुनील गावस्कर, राहुल द्रविड यांना बसला आहे, शिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भारतीय क्रिकेट संघाचा सल्लागार म्हणून निवड व्हावी ही प्रशिक्षक रवी शास्त्री यांची मागणीही याच कारणामुळे मान्य झाली नाही.

आता याच कारणामुळे विराटला हे पद लवकरच सोडावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे क्रिकेट प्रशासक समितीने कोणताही क्रिकेटर सरकारी किंवा खासगी कंपनीमध्ये काम करणार नाही असे बीसीसीआयला स्पष्ट शब्दात सांगितले आहे. याचीच अंमलबजावणी म्हणजे विराटला या पदावरून मुक्त व्हावे लागणार आहे.