Video- अशी गोलंदाजी केली तर एबी डिव्हिलियर्सला एकही धाव करता येणार नाही

बंगळुरू। आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात बेंगलोरकडून खेळताना आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलियर्सने शानदार अर्धशतक केले.

आज डिव्हिलियर्सने तुफानी खेळ करताना फक्त 39 चेंडूंतच नाबाद 90 धावा केल्या. त्याने त्याच्या या खेळीत 10 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याचा हा आक्रमक खेळ पाहताना इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने डिव्हिलियर्सला आक्रमक फलंदाजीपासून कसे रोखावे याचा मार्ग सुचवणारा हा एक गमतीशीर व्हिडीओ ट्विटरवरून शेयर केला आहे.

हा व्हिडीओ क्रिकेट इतिहासातील ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातील एका कुप्रसिद्ध क्षणाचा आहे. ज्यात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ट्रेवर चॅपलने न्यूझीलंडच्या ब्रायन मॅकेनी या फलंदाजाला अंडर आर्म चेंडू टाकला होता. ज्यामुळे मॅकेनी न्यूझीलंडला विजयासाठी हवे असणाऱ्या 6 धावा काढू शकणार नाही.

स्टोक्सने हा व्हिडीओ शेयर करून डिव्हिलियर्सला आज रोखणे अवघड असल्याचे सुचवले आहे. स्टोक्स सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. पण अजूनतरी त्याला यावर्षीच्या आयपीएलमध्ये खास काही करता आलेले नाही.