बेन स्टोक्सची इंग्लंडच्या वनडे संघात निवड

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सची इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी निवड केली आहे. परंतु तो खेळू शकेल की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे.

स्टोक्सला सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ब्रिस्टोल नाईटक्लबमध्ये मारहाण केल्याचा आरोपावरून अटक करण्यात आली होती याच प्रकरणामुळे त्याच्यावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने बंदी घातली होती.

त्याच्याबरोबरच याच प्रकरणात अडकलेला त्याचा संघ सहकारी अॅलेक्स हेल्स याचीही इंग्लंडच्या १६ जणांच्या वनडे संघात वर्णी लागली आहे.

स्टोक्सची या आधीही ऍशेस मालिकेसाठी उपकर्णधार म्हणून इंग्लंड संघात निवड झाली होती परंतु मारहाणीच्या प्रकरणाची चौकशी सुरु असण्याच्या कारणावरून त्याला संघातून पहिल्या दोन कसोटी सामन्यातून वगळण्यात आले होते.

इंग्लडच्या निवडसमितीने सांगितले की त्यांना एक मजबूत संघ निवडण्यास सांगितले होते. ” ब्रिस्टोल नाईटक्लबमध्ये मारहाण केल्याच्या प्रकरणानंतरही बेन स्टोक्स आणि अॅलेक्स हेल्स यांची निवड करण्यात आली असली तरी या प्रकरणाचा निर्णय लागल्यानंतरच त्यांच्या सहभागाविषयी ठरवण्यात येईल.” असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने सांगितले.

तसेच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने असेही सांगितले आहे की एकदा त्यांना स्टोक्स ला शिक्षा होईल की नाही हे समजले की पुढील ४८ तासात ते पुढचे पाऊल उचलतील.

इंग्लंडचा सलामीवीर असणारा हेल्सवर गुन्हेगारी आरोप लागणार की नाहीत हे या आठवड्यात ठरेल. त्यामुळे त्याच्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याचे दरवाजे खुले होतील.

स्टोक्स आणि हेल्स बरोबरच इंग्लंडच्या वनडे संघात सॅम बिलिंग्स आणि मार्क वूडचाही समावेश करण्यात आला आहे. ही ५ सामन्यांची वनडे मालिका १४ जानेवारीपासून सुरु होणार आहे.

इंग्लंडचा संघ: इयान मॉर्गन(कर्णधार),मोईन अली, जॉनी बेरस्टोव,जॅक बॉल,सॅम बिलिंग्स,जोस बटलर(यष्टीरक्षक),टॉम कुराण,अॅलेक्स हेल्स,लिअम प्लंकेट,आदिल रशीद, जो रूट,जेसन रॉय,बेन स्टोक्स,डेव्हिड विल्ली,ख्रिस वोक्स,मार्क वूड.