…आणि बेन स्टोक्सने मागितली केन विलियम्सनची माफी

लंडन। रविवारी(14 जूलै) 2019 क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात लॉर्ड्सच्या मैदानात पार पडला. शेवटच्या क्षणापर्यंत नाट्यपूर्ण झालेल्या या सामन्यात सुपर ओव्हरही बरोबरीत सुटल्यानंतर बाऊंड्रीच्या फरकांमुळे इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले.

या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूत नऊ धावांची गरज होती. याचवेळी या षटकातील चौथा चेंडू ट्रेंट बोल्टने फुलटॉस टाकला. यावर स्टोक्सने डीप मिड-विकेटला फटका मारला आणि दोन धावा घेण्यासाठी तो धावला.

पण मार्टिन गप्टिलने चेंडू आडवत चेंडू स्ट्रायकर एन्डच्या दिशेने फेकला. या वेळी स्टोक्स दुसरी धाव घेत होता आणि गप्टिलने फेकलेला तो चेंडू स्टोक्सच्या बॅटला लागून बाऊंड्री लाईन पार करुन गेला. त्यामुळे इंग्लंडला त्या चेंडूवर पळून काढलेल्या दोन धावा आणि ओव्हर थ्रोचा चौकार असे मिळून 6 धावा मिळाल्या. त्यामुळे या सामन्यालाही कलाटणी मिळाली.

या घटनेबद्दल स्टोक्स म्हणाला, ‘मी केनला म्हणालो, माझ्या पुढील उर्वरित आयुष्यात यासाठी माफी मागेल. मी असे करु इच्छित नव्हतो. तो चेंडू माझ्या बॅटला लागला आणि चौकार गेला. मी याबद्दल केनची माफी मागितली.’

तसेच या घटनेबद्दल विलियम्सन म्हणाला, ‘ही खूप शरमेची गोष्ट आहे. अशा महत्त्वाच्या क्षणाला असे पुन्हा होऊ नये, अशी मी आशा करतो.’

स्टोक्सने इंग्लंडच्या या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने 242 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची आवस्था 23.1 षटकात 86 धावात 4 विकेट अशी असताना 98 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या होत्या. तसेच जॉस बटलरबरोबर 110 धावांची पाचव्या विकेटसाठी भागीदारी केली होती.

त्याचबरोबर त्याने सुपर ओव्हरमध्येही बटलर बरोबर फलंदाजी करताना 8 धावाही केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.

विजय मिळवल्यानंतर स्टोक्स म्हणाला, ‘चार वर्षात केलेल्या महेनतीचे फळ मिळाले आहे, हेच आम्हाला अपेक्षित होते. मला वाटत नाही या सामन्यासारखा कोणता सामना क्रिकेट इतिहासात होईल.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

नोव्हाक जोकोविचने फेडररचा पराभव करत पाचव्यांदा मिळवले विम्बल्डनचे विजेतेपद

संपूर्ण यादी: आत्तापर्यंत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हे खेळाडू ठरले सामनावीर

केन विलियम्सन असा पराक्रम करणारा केवळ दुसराच कर्णधार!