प्रो कबड्डी: बेंगलुरू बुल्सकडून मोसमाची विजयी सुरुवात, टायटन्सचा दुसरा पराभव

प्रो कब्बडीमध्ये ३० जुलै रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात झोन B मधील संघ तेलगू टायटन्स आणि बेंगलूरु बुल्स एकमेकांसमोर उभे होते. नाणेफेकीचा कौल टायटन्सने जिंकला आणि पहिली रेड करण्यासाठी राहुल चौधरी आला. सर्व प्रेक्षकांना वेध लागले होते ते राहुलच्या ५००व्या रेडींग गुणाचे. काल राहुलने पटणाच्या संघाविरुद्ध खेळताना रेडींगमध्ये ७ गुणांची कमाई करत रेडींगमधील गुणांची संख्या ४९९ इतकी केली होती. काल शेवटच्या काही मिनिटामध्ये तो सातत्याने अपयशी ठरला आणि ५००वा गुण मिळवू शकला नाही.

आज राहुलने बेंगलुरू बुल्स संघाविरुद्ध खेळताना ५००वा गुण मिळवला आणि प्रो कबड्डीच्या इतिहासात रेडींग मध्ये ५०० गुण मिळवण्याचा मान मिळवला. पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही, रोहित कुमारच्या आक्रमक रेड्समुळे तेलगू टायटन्स संघ ऑलआऊट झाला. राहुल बेंगलुरू बुल्ससाठी रेडींगमध्ये गुण मिळवत होता तर रविंदर पहल डिफेन्समध्ये गुणांची कमाई करत होता. पहिला हाफ संपला तेव्हा बेंगलुरु बुल्स संघ आघाडीवर होता.

दुसऱ्या हाफमध्ये तेलुगू टायटन्स संघाने आक्रमक खेळ केला आणि सामना बरोबरीत आणण्याचा खूप प्रयत्न केला. पण राहुल रेडींगमध्ये बाद झाल्यामुळे ते ७-८ गुणांनी पिछाडीवर होते. अजय कुमारने बुल्ससाठी सुपर रेड केली आणि गुणांची आघाडी वाढवत सामन्याचा निकाल निश्चित केला. या सामन्यात रोहितकुमार रेडींग करताना एकदाही बाद झाला नाही आणि त्याने सुपर टेन केले.

एकतर्फीच झालेल्या या सामन्यात बेंगलुरू बुल्सने तेलगू टायटन्सवर ३१-२१ असा विजय मिळवला. या विजयासह बेंगलुरू बुल्स संघाने या मोसमाची विजयी सुरुवात केली.

या सामन्याचे वैशिष्ट म्हणजे रोहित कुमारने अक्की असे नाव लिहलेली जर्सी घातली होती. त्याचा आवडता अभिनेता अक्षयकुमार याला त्याचे चाहते अक्की असे म्हणतात. एकूणच रोहित आणि बेंगलुरूसाठी हा विजय महत्वाचा ठरला.