प्रो कबड्डी: रोमहर्षक सामन्यात बेंगळुरू बुल्स विजयी

प्रो कबड्डीमध्ये नागपुरात झालेल्या पहिल्या सामन्यात बेंगळुरू बुल्स संघाने तामिल थालयवाजचे कडवे आव्हान परतवून लावले. अत्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात बेंगळुरू बुल्स संघाने ३२-३१ असा निसटता विजय मिळवला. बेंगळुरू बुल्ससाठी कर्णधार रोहित कुमार आणि आशिष सांगवान यांनी उत्तम खेळ केला तर तामिळ संघाकडून कर्णधार अजय ठाकूर आणि के. प्रपंजन हे चमकले.

पहिल्या सत्रात पूर्ण वर्चस्व बुल्सस संघाचे राहिले. बेंगळुरू बुल्सस संघाने पहिल्या सत्राच्या १०व्या मिनिटाला १३-५ अशी भक्कम आघाडी मिळवली होती. त्यांनी तामिल संघाला पहिल्या सत्रात दोन वेळा ऑल आऊट केले. पहिले सत्र संपले तेव्हा बेंगळुरू बुल्स २३-८ असा पुढे होता. पहिल्या सत्रात १५ गुणांची आघाडी बेंगळुरू बुल्सने मिळवली. यात बुल्सचा कर्णधार रोहित कुमारने रेडींगमध्ये उत्तम कामगिरी केली.

दुसरे सत्र या मोसमातील सर्वात रोमहर्षक झाले. रोहित या सत्रात ५व्या मिनिटाला बाद झाला आणि सामन्याचे चित्र पलटण्यास सुरुवात झाली. बंगळुरू बुल्सचा संघ १०व्या मिनिटाला ऑलआऊट झाला आणि सामना २९-१८ अश्या स्थितीत आला. तामिळ संघाने उत्तम खेळ करत बंगळुरू बुल्स संघाला सामना संपण्यास ३ मिनिटे बाकी असताना ऑल आऊट केले आणि सामना ३१-२८ अश्या स्थितीत नेला. शेवटच्या तीन मिनिटात बेंगळुरू बुल्स संघाने सामन्याची गती कमी कारण्यावर भर दिला आणि काही एम्प्टी रेडच्या मदतीने आणि रोहित कुमारच्याचकर्णधाराला साजेश्या खेळीने या सामन्यात ३२-३१असा  निसटता विजय मिळवला.