बेंगलूरु बुल्सने केला युपीचा दारुण पराभव

प्रो कबड्डीमध्ये पुणे लेगच्या चौथ्या दिवशी बेंगलूरु बुल्स आणि युपी योद्धा यांच्यात सामना झाला. हा सामना मुंबई लेगमध्ये पावसाचा व्यत्यय आल्यामुळे होऊ शकला नव्हता, तो आज खेळवला गेला. या सामन्यात बेंगलूरु बुल्सने युपी संघाचा ६४-२४ असा मोठ्या फरकाने दारुण पराभव केला. या सामन्यात बुल्ससाठी रोहितने ३२ गुण मिळवत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी केली.

पहिल्या सत्रापासूनच बुल्स संघाचा सामन्यावर दबदबा राहिला. सामन्याची सर्व सूत्रे हातात घेत रोहितने रेडींगमध्ये गुण मिळवण्याचा सपाटाच सुरु केला. ८व्या मिनिटालाच ऑल आऊट झाले. यावेळी बेंगलूरु बुल्स संघाने ११-३ अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर पुन्हा १३ व्या मिनिटाला युपी संघावर ऑल आऊट होण्याची नामुष्की ओढवली आणि बुल्सची बढत २०-४ अशी झाली.

दुसऱ्या सत्रात तर रोहितचा खेळ आणखीनच बहारदार झाला. त्याला रोखण्यात युपीचे खेळाडू कमी पडत होते. रोहितने रेडींगमध्ये ३० गुण मिळवत रिशांक देवाडिगाचा विक्रम मोडला. युपीला दुसऱ्या सत्रात तीन वेळा ऑल आऊट करत बुल्सने सामना ६४-२४ असा खिशात घातला.

या सामन्यात युपीचा कर्णधार राजेश नरवाल होता. रिशांक देवाडिगा आणि नितीन तोमर याना या सामन्यासाठी आराम देण्यात आला होता.