ISL 2017: बेंगळुरू-चेन्नई यांच्यात महत्त्वाची लढत

चेन्नई |  हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) चौथ्या मोसमात लक्षवेधी कामगिरी करीत असलेल्या बेंगळुरू एफसी आणि चेन्नईयीन एफसी या दोन संघांमध्ये येथील नेहरू स्टेडियमवर मंगळवारी लढत होत आहे.

बेंगळुरू गुणतक्त्यात पहिल्या, तर चेन्नईयीन दुसऱ्या स्थानावर आहे. बाद फेरीच्यादृष्टिने दोन्ही संघ चांगल्या स्थितीत असले तरी लढत महत्त्वाची असेल. बेंगळुरूपेक्षा चेन्नईयीन चार गुणांनी मागे आहे, पण जॉन ग्रेगरी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या चेन्नईचा एक सामना कमी आहे. चेन्नईने बेंगळुरूमधील लढतीत 2-1 असा विजय मिळविला होता. मंगळवारी सुद्धा जिंकल्यास चेन्नईला पिछाडी एका गुणापर्यंत कमी करता येईल, पण हे तेवढे सोपे नसेल. बेंगळुरूने सलग तीन सामने जिंकले असून त्यांचा संघ फॉर्मात आहे. त्यामुळे घरच्या मैदानावरील पराभवाची परतफेड करण्याचा त्यांचा निर्धार असेल.

ग्रेगरी यांना संघासमोरील आव्हानाची जाणीव आहे. खरा मोसम आताच सुरू होत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले की, तुमचा खेळ किती चांगला आहे हे आता समजून येईल. गुणतक्त्यातील स्थानासाठी तीव्र चुरस सुरू आहे. हे जणू काही फॉर्म्युला वनमधील सराव सत्रासारखे आहे. आता आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत आणि खरी शर्यत उद्या होईल. 17 दिवसांत आमचे पाच सामने होतील. आम्ही बाद फेरी गाठणार का, हे त्यानंतर कळेल.

महत्त्वाच्या लढतीसाठी संघनिवडीबद्दल ग्रेगरी म्हणाले की, सर्व खेळाडू खेळण्यासाठी उपलब्ध आहेत, पण मी सामन्यापूर्वीच निर्णय घेईन. या महत्त्वाच्या टप्यासाठी प्रत्येक जण तंदुरुस्त आणि सज्ज आहे. आमचा वैद्यकीय स्टाफ खूप चांगला असून ते खेळाडूंची चांगली काळजी घेत आहेत. हे माझे सुदैव आहे.

पहिल्या सामन्यातील विजय चेन्नईच्या जमेची बाजू असली तरी बेंगळुरूचे प्रशिक्षक अल्बर्ट रोका यांच्या मतानुसार त्या निकालाचा आपल्या खेळाडूंवर काहीही परिणाम होणार नाही. त्यांनी सांगितले की, चेन्नईविरुद्धचा पराभव म्हणजे संकट नव्हते. आम्हाला अर्थातच सर्व सामने जिंकायला आवडते. मंगळवारी आम्हाला धैर्याने खेळ करावा लागेल आणि तीन गुण जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल.

बेंगळुरूसाठी आयएसएलमधील पदार्पणाचा मोसम आनंददायक ठरला आहे. नव्या लीगशी रोका यांच्या संघाने सहजतेने जुळवून घेतले आहे आणि हा संघ आता विजेतेपदाचा भक्कम दावेदार बनला आहे. स्पेनच्या रोका यांच्या मते मात्र आताच असा दावा करणे घाईचे ठरेल.

त्यांनी सांगितले की, लीग अद्याप संपलेली नाही. आम्हाला आधी सर्व साखळी सामने पूर्ण करावे लागतील. त्याविषयी आम्ही थोडे बोलू शकू, पण नंतर आम्हाला बाद फेरीतून पुढे जावे लागेल. या घडीला सहा संघ बाद फेरीतील चार स्थानांच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे पहिल्या चार संघांमध्ये येणे पहिले लक्ष्य आहे. आम्ही मंगळवारी तीन गुण जिंकले तर आम्ही लक्ष्याजवळ जाऊ.