ISL: मुंबईवरील विजयासह बेंगळुरु एफसीची आघाडी

मुंबई: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) पदार्पण करणाऱ्या संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीने मुंबई एफसीवर 3-1 असा दणदणीत विजय संपादन केला. याबरोबरच बेंगळुरूने गुणतक्त्यात आघाडी घेतली. कर्णधार सुनील छेत्रीच्या दोन गोलांमध्ये मिकूने भर घातली.

 

बेंगळुरूने 11 सामन्यांत सातवा विजय मिळविला. त्यांचे चार पराभव झाले आहेत. त्यांचे सर्वाधिक 21 गुण झाले. चेन्नईयीन एफसीला (10 सामन्यांत 20 गुण) त्यांनी एका गुणाने मागे टाकले. मुंबईला 11 सामन्यांत पाचवा पराभव पत्करावा लागला. चार विजय व दोन बरोबरीसह 14 गुण मिळवून त्यांचे पाचवे स्थान कायम राहिले.

 

छेत्री याआधी मुंबई सिटी एफसीकडून खेळायचा. तीन मिनीटे बाकी असताना त्याच्याऐवजी बदली खेळाडू पाठविण्यात आला. छेत्री मैदानावरून परत जात असताना मुंबई फुटबॉल एरीनावरील चाहत्यांनी त्याला मानवंदना दिली. त्यावरून छेत्रीची लोकप्रियता कायम असल्याचे दिसून आले.

 

42व्या मिनीटाला छेत्रीने बोईथांग हाओकीप याच्या साथीत घोडदौड केली. छेत्री गोलसाठी प्रयत्न करणार तोच बलवंत सिंगने त्याला पाठीमागून रोखले. त्यानंतर लगेच पंचांनी बेंगळुरूला पेनल्टी बहाल केली. त्यांच्या या निर्णयावर मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याने हुज्जत घातली. त्याबद्दल त्याला पिवळे कार्ड दाखविण्यात आले. हे नाट्य घडल्यानंतर छेत्री पेनल्टी घेण्यासाठी सज्ज झाला. त्याने अमरिंदरचा अंदाज चुकवित नेटच्या डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला शांतचित्ताने चेंडू मारला. पुर्वार्धात बेंगळुरूने या गोलची आघाडी राखली.

 

उत्तरार्धातही बेंगळुरूने निर्धाराने खेळ केला. 52व्या मिनीटाला उदांता सिंगने उजवीकडून चाल रचली. त्याने छेत्रीला पास दिला. छेत्रीने पेनल्टी किक घेताना मारला तसाच फटका लगावला चेंडू नेटमध्ये  जवळपास त्याच ठिकाणी नेटमध्ये घालविला. त्यानंतर मिकूने गोल केला.

 

घरच्या मैदानावर मुंबईची प्रतिक्षा अखेर 76व्या मिनीटाला संपुष्टात आली. एचीले एमाना याने डावीकडून चाल लचत बलवंतला पास दिला. बॉक्समध्ये बलवंतने लिओ कॉस्टाकडे चेंडू दिला. मग कॉस्टाने उरलेले काम फत्ते केले. त्यानंतर मात्र मुंबईला आणखी भर घालता आली नाही.

 

सामन्याची सुरवात आक्रमक झाली. दुसऱ्याच मिनीटाला बेंगळुरूच्या डिमास डेल्गाडोने मुंबईच्या थियागो सँटोसला पाडले. त्याने पाठीमागून धक्का मारला. त्यामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंत वादावादी झाली. पाचव्या मिनीटाला बेंगळुरूच्या एरीक पार्टालूने आगेकूच केली, पण त्याचा प्रयत्न अमरिंदरने रोखला. आठव्या मिनीटाला मुंबईसाठी एचीले एमाना याने चांगील चाल रचली. त्याने डावीकडून बलवंतला पास दिला, पण बलवंतने मारलेला चेंडू क्रॉसबारच्या वरून गेला.

 

15व्या मिनीटाला बलवंतला बेंगळुरूच्या जुआनन याने रोखले. त्यानंतर थोड्या वेळातच एमानाचा प्रयत्न गुरप्रीतने रोखला. 18व्या मिनीटाला बेंगळुरूचा फॉर्मातील स्ट्रायकर मिकूला हाओकीप याच्याकडून पास मिळाला. त्यावर मिकूने हेडींग केले, पण त्यात अचूकता नव्हती. 22व्या मिनीटाला सेहनाज सिंग बलवंतला पास देण्याच्या प्रयत्नात होता, पण बलवंतला बेंगळुरूच्या हरमनज्योत खाब्राने धक्का दिला. बलवंतने पेनल्टीचे अपील केले, पण पंचांनी ते फेटाळून लावले.

 

25व्या मिनीटाला उदांता सिंगने घोडदौड करीत छेत्रीला पास दिला, पण छेत्रीने थेट अरिंदरच्या हातात चेंडू मारला. 35व्या मिनीटाला मुंबईने जोरदार प्रयत्न केला. एव्हर्टन सँटोसने बलवंतच्या दिशेने चेंडू मारला. त्यावर बलवंतने ताकदवान हेडींग केले, पण गुरप्रीतने अचूक अंदाज घेत चेंडू थोपविला. 38व्या मिनीटाला बलवंत आणि खाब्रा यांच्यात वाद झाला. त्यात बलवंतने खाब्राच्या तोंडावर कोपराने मारले. त्यामुळे त्याला पिवळे कार्ड दाखविण्यात आले.

 

निकाल:

मुंबई सिटी एफसी:   1 (लिओ कॉस्टा 76) पराभूत विरुद्ध

बेंगळुरू एफसी:  (सुनील छेत्री 43-पेनल्टी, 52, मिकू 63)

 

गुणतालिका: