पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत सक्षम भन्साळी, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद  

पुणे | पुणे महानगर पालिका यांच्या तर्फे आयोजित व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत 10वर्षाखालील मुलांच्या गटात सक्षम भन्साळी याने, तर मुलींच्या गटात प्रिशा शिंदे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद पटकावले. 
 
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 10वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित सक्षम भन्साळीने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत बाराव्या मानांकित शार्दूल खवळेचा 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकवले. याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित सक्षम भन्साळीने नवव्या मानांकित श्रीराम जोशीचा 5-0, असा तर बाराव्या मानांकित शार्दुल खवळेने तिसऱ्या मानांकित सूर्या काकडेचा 5-2असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. 
 
मुलींच्या गटात प्रिशा शिंदे हिने मृणाल शेळकेचा 6-2असा एकतर्फी पराभव करून या गटाचे विजेतेपद मिळवले. प्रिशा ही संस्कृती शाळेत चौथी इयत्तेत शिकत असून सोलारिस क्लब येथे प्रशिक्षक रवींद्र पांडे यांच्यामार्गदर्शनाखाली सराव करते. याआधीच्या उपांत्य फेरीत मृणाल शेळकेने काव्या देशमुखचा 5-2, असा तर प्रिशा शिंदेने रितिका कापलेचा 5-1असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: 10वर्षाखालील मुले:
सक्षम भन्साळी(1)वि.वि.श्रीराम जोशी(9)5-0;
शार्दुल खवळे(12) वि.वि.सूर्या काकडे(3)5-2;
अंतिम फेरी: सक्षम भन्साळी(1)वि.वि.शार्दुल खवळे(12)6-3; 
 
10 वर्षाखालील मुली:उपांत्य फेरी: 
मृणाल शेळके वि.वि.काव्या देशमुख 5-2;  
प्रिशा शिंदे वि.वि.रितिका कापले 5-1; 
अंतिम फेरी: प्रिशा शिंदे वि.वि.मृणाल शेळके 6-2.