संजय बांगर सहाय्यक प्रशिक्षक तर भरत अरुण गोलंदाजी प्रशिक्षक

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याच्या कोर टीमची घोषणा केली असून त्यात पूर्वीचेच सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर सहाय्यक प्रशिक्षक तर भरत अरुण गोलंदाजी प्रशिक्षक यांना पुन्हा त्याच जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

आर श्रीधर यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. संजय बांगर यांच्याकडे सहाय्यक प्रशिक्षकांची जबाबदारी ही २०१९ च्या ५० षटकांच्या विश्वचषकापर्यंत असेल.

माध्यमांशी संवाद साधताना साष्टी यांनी त्यांची कोर टीम काय असावी याबद्दल ते अतिशय स्पष्ट होते. यावेळी शास्त्री यांनी क्रिकेट सल्लागार समिती अर्थात सीएसीचेही आभार मानले. आणि भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होणे ही अभिमानाची गोष्ट असल्याचंही शास्त्री यांनी सांगितलं.

झहीर खान आणि राहुल द्रविड यांच्या नियुक्तीवरून जो काही संभ्रम निर्माण झाला आहे त्याबद्दल मात्र कोणतीही स्पष्ट भूमिका शास्त्री यांनी मांडली नाही. या दोघांनाही अनुक्रमे गोलंदाजी सल्लागार आणि फलंदाजी सल्लागार म्हणून निवडण्यात आले होते.

संजय बांगर यापूर्वी भारताकडून १२ कसोटी सामने आणि १५ एकदिवसीय सामने खेळलेआहेत. ४५ वर्षीय बांगर यांनी कसोटीमध्ये ४७० आणि एकदिवसीय सामन्यांत १८० धावा केल्या आहेत. तर ५४ वर्षीय भरत अरुण भारताकडून २ कसोटी सामने आणि ४ एकदिवसीय सामने खेळले आहेत.