भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १२- शापितांचा शापित

-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund)
हरयाणा आणि मुंबईत १९९१ च्या रणजी करंडकाचा अंतिम सामना. मुंबईला जिंकण्यासाठी फक्त तीन धावांची तर हरयाणाला एका बळीची गरज. खेळपट्टीवर शतकवीर दिलीप वेंगसरकर आणि अॅबी कुरवीला. तरीही मुंबईकर समर्थक बिनधास्त. अजूनही १५ चेंडू बाकी. त्यात वेंगसरकर खेळतोय म्हटल्यावर त्यांना ‘आपण जिंकतोय’ असाच विश्वास. कुरवीलाने एक चेंडू तटवला. वेंगसरकरचा रनर असलेला लालचंद राजपूत एक धाव घेण्यासाठी धावला पण कुरवीला मात्र जागीच उभा. राजपूत म्हणजे वेंगसरकर धावबाद. मुंबई पराभूत. तेही वानखेडेवर. पराभवानंतर वेंगसकर अक्षरशः लहान मुलासारखा रडला. मुंबई हरल्याचं तितकंच दुःख सीमारेषेवर बॉलबॉय म्हणून काम करणाऱ्या एका मुलालाही झालं. मुंबईने हरलेल्या सामन्याने त्या मुलाच्या मनावर मोठा परिणाम झाला. किती? तर अगदी आजही त्याला त्या सामन्यातल्या मुंबईच्या ११ खेळाडूंची नावे ठळकपणे आठवतात.एकीकडून संघाची पडझड होत असताना शेवटपर्यंत एक बाजू कशी लावून धरायची हेही ह्याच सामन्याने त्याला शिकवले. हरयाणाच्या विजयानंतर तो कपिल देवकडे ऑटोग्राफ मागायला गेला. ऑटोग्राफ देताना कपिलने त्याला विचारले,
“क्रिकेट खेळतोस का?”
“हो मी मुंबईच्या १६ वर्षाखालील संघाचा कर्णधार आहे.”
ते ऐकून कपिल त्याला म्हणाला, “इथून पुढे ऑटोग्राफ मागू नकोस. इतरांना ऑटोग्राफ देत जा.”
पुढे जाऊन तो मुंबईसाठी रणजी खेळला. मुंबईचा कर्णधार होत त्याने मुंबईला रणजी करंडकही जिंकून दिला. तो मुलगा होता अमोल अनिल मुजूमदार. तोच जो सचिन आणि कांबळी ६६४ धावांची विश्वविक्रमी भागीदारी करत असताना पॅड लावून बसला वाट पाहत राहिला.
अमोलचे वडील स्वतः मुंबईत क्लब क्रिकेट खेळायचे. अमोल लहान असतानाच त्यांनी ठरवले की मी याला क्रिकेटपटू बनवणार. तो सराव करत असताना त्याचे वडील लोकांना सांगत, “तुम्ही फक्त पहात रहा. मी याला मोठा क्रिकेटपटू बनवणार.” आणि पुढे तसे झालेही.
आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली अमोलने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरवात केली.
वयाच्या १४ व्या वर्षी १९८८ मध्ये, मुंबईच्या १५ वर्षाखालील संघाकडून खेळताना आपल्या पहिल्याच सामन्यात अमोलने नाबाद १२५ धावा काढल्या. पुढे १९९१ मध्ये  मुंबईच्या १६ वर्षाखालील संघाकडून खेळताना त्याने सलग तीन सामन्यांत शतक काढले. त्याच्या पुढच्या वर्षी मुंबईच्या १९ वर्षाखालील संघासाठी ३ शतके काढली. नंतर १९९४ च्या एम ए चिदंबरम करंडकात त्याने मुंबईकडून ५ शतके काढली. एवढी गुणवत्ता दाखवल्यावर साहजिकच अमोलची निवड भारताच्या १९ वर्षाखालील संघात करण्यात आली. त्याचवेळी त्याची मुंबईच्या रणजी संघातही निवड झाली. त्याने मुंबईकडून रणजी पदार्पण करणे पसंत केले. मुंबईकडून रणजीमध्ये पदार्पण करण्याअगोदर अमोलने मुंबईच्या १५, १६, १७ आणि १९ वर्षाखालील संघांकडून खेळताना जवळपास १५ शतके काढली होती. असे असताना मुंबईच्या संघात त्याला स्थान न मिळणे ही बातमी झाली असती.
रणजी करंडकाच्या ९३-९४ च्या हंगामात हरयाणाविरुद्ध अमोलने मुंबईकडून पदार्पण केले. त्यावेळी मोबाईल वगैरे नव्हतेच. त्यामुळे अमोल प्लेयिंग इलेव्हनमध्ये आहे हे त्याला मुंबईचा त्यावेळचा कर्णधार रवी शास्त्रीने कुणाकडे तरी निरोप देऊन कळवले. तू चौथ्या क्रमांकावर खेळणार आहेस हेही रवीने सांगितले. या सामन्यात २ बाद ४७ वर अमोल खेळायला गेला. त्यानंतर अमोल आणि जतिन परांजपे यांची जोडी जमली. आपल्या पहिल्याच सामन्यात अमोलने २६० धावा काढल्या.प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात कोणत्याही खेळाडूने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.हा विक्रम आजतागायत अबाधित आहे. द्विशतक केल्यावर शास्त्रीने अमोलची पाठ थोपटत म्हटले, “वेल डन यंग बॉय.” ही शाबासकी आपण आयुष्यभर विसरू शकणार नाही असे अमोल सांगतो.
अमोलचं नशीब बघा. त्याचा पहिला सामना वेस्टइंडीजचे महान खेळाडू क्लाइव्ह लॉईड यांनीसुद्धा पाहिला. त्या सामन्यात वापरलेली बॅट हंगामाच्या शेवटी अमोलने पुन्हा कधीही न वापरण्यासाठी कपाटात ठेवून दिली. ज्या बॅटने मला ओळख दिली तिची जागा आता कायम या कपाटात असेल हा त्यामागचा विचार.
अमोलच्या  पदार्पणाचा सामना मुंबईने डावाने जिंकला. त्याच हंगामात आपल्या दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध अमोलने ५५ आणि नाबाद १०१ धावांच्या खेळी करत आपले नाणे पुन्हा एकदा खणखणीत वाजवले. आपल्या पहिल्याच हंगामात अमोलने ३ सामन्यांत १६४ च्या सरासरीने ४९४ धावा काढत आपणही मुंबईच्या तालमीत तयार झालेले ‘खडूस’ फलंदाज आहोत हे सिद्ध केले. पुढचा सचिन तेंडुलकर म्हणून अमोलचा गवगवा सुरु झाला. पहिल्या हंगामातल्या त्याच्या कामगिरीमुळे १९९४ साली त्याचा भारताच्या १९ वर्षाखालील संघात उपकर्णधार म्हणून समावेश करण्यात आला. या संघात त्याच्याबरोबर गांगुली आणि द्रविडही यांची निवड झाली. भारतीय संघातल्या स्थानासाठी आपण एकेमेकांशीच स्पर्धा करतो आहोत याची या तिघांना त्यावेळी कल्पनाही नसेल. पुढच्या वर्षी १९९५ मध्ये इंग्लंडचा १९ वर्षाखालील संघ भारत दौऱ्यावर आला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने भारताचा ३-० असा पराभव केला. भारताकडून खेळताना द्रविड जसा भिंतीप्रमाणे उभा राहायचा तसाच तो याही मालिकेत उभा राहिला. अमोल या मालिकेत फारशी चमक दाखवू शकला नाही आणि भारतीय संघात प्रवेशासाठीची पहिली बस त्याच्याकडून सुटली.
त्याच हंगामातल्या दुलिप ट्रॉफीमध्ये अमोलने चांगल्या धावा काढल्या. या कामगिरीच्या जोरावर १९९६च्या इंग्लंड दौऱ्यासाठी आपली दावेदारी त्याने पेश केली. मात्र तिथेही द्रविडने आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेतले. दुसऱ्या जागेसाठी अमोलऐवजी बंगालच्या गांगुलीला संधी मिळाली. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातून खेळलेल्या गांगुली आणि द्रविडने काय केले सर्वश्रुत आहे. त्यानंतर मात्र भारतीय संघात संधी मिळवण्यासाठी अमोलला कायमच वाट पहावी लागली.
दरम्यान रणजी करंडकाच्या लागोपाठच्या हंगामांत एक हंगाम वगळता अमोलने ४५७, ३६७, ८६८, ५५४, ६५९ असा धावांचा रतीब घातला. यानंतरही त्याला भारतीय संघात संधी मिळालीच नाही. अमोल तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. नेमक्या याच क्रमांकांवर फलंदाजी करायला भारतीय संघात द्रविड,तेंडुलकर त्यांच्या खालोखाल गांगुली, लक्ष्मण असे महारथी होते. त्यामुळे इतकं खणखणीत नाणं असूनही अमोलला भारतीय संघात कधी संधी मिळालीच नाही. दरम्यान त्याचे मुंबईचे संघ सहकारी साईराज बहुतुले, निलेश कुलकर्णी, वासिम जाफर हे भारतीय संघात येऊन जाऊन का होईना खेळत राहिले. अशा वेळी अमोलची मानसिक स्थिती काय असेल याची कल्पनाच केलेली बरी.
अमोली निराश न होता खेळत राहिला. पोत्याने धावा काढत राहिला. माझाही सूर्य कधीतरी उगवेल अशी आशा धरून राहिला. अखेरीस तोही माणूस आहे. त्यामुळे इतक्या वेळेस स्वतःची क्षमता सिद्ध करूनही आपली भारतीय संघात निवड होत नाही म्हटल्यावर २००१ च्या आसपास अमोल निराश होऊ लागला.  त्या हंगामात अमोलने ११ डावांत फक्त ३०५ धावा काढल्या. अमोलने इतक्या कमी धावा काढणे हे आश्चर्यकारक होते. यामुळेच की काय २००२ मध्ये त्याच्या मनात निवृत्तीचा विचारही आला. मात्र त्याची बायको आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, मुंबई क्रिकेट अतिशय जवळून पाहिलेले ज्येष्ठ पत्रकार मकरंद वायगणकर यांनी अमोलला निवृत्तीचा निर्णय घेण्यापासून थांबवले. अमोलने पुन्हा एकदा क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. पुनरागमन करत २००३-०४ च्या हंगामात ९ सामन्यांत ६४३ धावा काढत जणू पिक्चर अभी भी बाकी है असाच संदेश दिला.
संघामधली ज्येष्ठता वाढली तशी त्याच्याकडे २००६-७ च्या हंगामासाठी कर्णधारपदाची जबादारी सोपवण्यात आली. ती समर्थपणे पेलत त्याने त्या वर्षी मुंबईला रणजी करंडक मिळवून दिला. हा करंडक मुंबईसाठी खास होता. मुंबईचे बंगाल आणि पंजाबविरुद्धचे पहिले दोन सामने अनिर्णित राहिले. दोन्ही सामन्यांत मुंबई पहिल्या डावात आघाडीदेखील घेऊ शकली नाही. तिसऱ्या सामन्यात हैदराबादने मुंबईला घरच्या मैदानावर हरवले. मुंबईला परत येताना संपूर्ण संघ निराश होऊन हैदराबादच्या विमानतळावर बसला होता. त्यावेळी कर्णधार म्हणून अमोलने आपल्या संघाला उभारी दिली. आपण अजूनही जिंकू शकतो असा विश्वास त्यांच्या मनात पैदा केला. गुजरात,राजस्थान आणि महाराष्ट्राविरुद्धचे विरुद्धचे पुढील तीनही सामने मुंबईने डावाने जिंकले. उपांत्य सामन्यात बडोदा आणि अंतिम सामन्यात बंगालला हरवत मुंबईने रणजी करंडक पटकावला. या हंगामाच्या आठवणी आजही अमोलच्या अंगावर काटा आणतात. असा हंगाम पुन्हा कधीही होणार नाही असे तो पुन्हापुन्हा सांगतो.
पुढच्या दोन रणजी हंगामात अमोलने अनुक्रमे ५०२ आणि ३५९ धावा काढल्या. उत्तर प्रदेशला हरवून २००८-०९ चा रणजी करंडक मुंबईने जिंकला. मैदानावर संघासोबत अमोलनेही आनंद साजरा केला. मात्र हॉटेलवर आपल्या रूममध्ये येताच अमोल ढसाढसा रडला. अंतिम फेरीच्या सामन्यात आपण संघात नसल्याचे ते अश्रू होते. त्यावेळी अमोलला कल्पनाही नव्हती की तो मुंबईसाठी पुन्हा कधीच खेळणार नाहीये. पुढे त्याचवर्षीच्या बुचीबाबू करंडकरांसाठी त्याला मुंबईच्या संघातून डच्चू देण्यात आला. अमोलनेही हा इशारा समाजत एकदम आसामचा रस्ता धरला. प्लेट डिव्हिजनमधून खेळणाऱ्या आसाम संघाला त्याने एलिट डिव्हिजनमध्ये प्रवेश मिळवून दिला. दरम्यान २००८ साली सुरु झालेल्या आयपीएलसाठी कोणत्याही संघाने अमोलचा विचार केला नाही. तेव्हाही तो निराश झाला. आसामकडून दोन हंगाम खेळल्यानंतर त्याने पुन्हा एकदा मुंबईकडून खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र एकदा संघ सोडल्यावर पुन्हा संघात परतण्यासाठीचा कुल ऑफ पिरीयड संपला नसल्याचे कारण देऊन त्याची विनंती फेटाळण्यात आली. मग त्याने २०१२-१३ चा हंगाम आंध्रप्रदेशकडून खेळत त्या हंगामात ९०० हुन जास्त धावा काढत पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली. अखेरीस २०१४ च्या हंगामादरम्यान अमोलने निवृत्ती घेतली. आपल्या २० वर्षांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत अमोलने ३० शतके आणि ६० अर्धशतकाच्या मदतीने १११६७ धावा काढल्या. कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर अमोल आणि त्याचा संघसहकारी वासिम जाफर यांच्यात रणजीमध्ये सर्वाधिक धावा काढण्याची जणू स्पर्धा लागली होती. आजही वासिम जाफरच्या १०७३८ धावानंतर नंतर अमोलच्या ९२९२ धावा दुसऱ्या क्रमांकाच्या आहेत.
अमोलमध्ये गुणवत्ता ठासून भरली होती. भारतीय संघात प्रवेशासाठी त्याने वेळोवेळी आपली दावेदारी सिद्धही केली. पण तो चुकीच्या युगात जन्माला आला असेच म्हणावे लागेल. मागे एकदा खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात द्वारकानाथ संझगिरींनी अमोलबद्दल एक किस्सा सांगितला. निवड समितीच्या एका सदस्याला अमोलने नको तेव्हा नको त्या ठिकाणी पाहिले आणि त्यामुळे त्याची भारतीय संघात कधीही निवड होऊ शकली नाही असे त्यांनी सांगितले. तो सदस्य कोण होता आणि कुठे होता हे आजही कुठे बाहेर आल्याचे ऐकिवात नाही. मात्र या प्रसंगामुळे भारतीय संघ  एका कसलेल्या खेळाडूला मुकला असेच म्हणावे लागेल.
भारताकडून संधी न मिळालेल्या अमोलने अखेरीस नेदरलँडकडूनही खेळण्याचा प्रयत्न केला. नेदरलँडमध्ये सलग चार वर्षे क्लब क्रिकेट खेळले की त्यांच्या आंतरराष्ट्रीय संघात प्रवेशासाठी तुम्ही पात्र ठरता. अमोलने हे निकष पारही केले.  नेदरलँडच्या संघासाठी फलंदाजीचा सल्लागार म्हणूनही त्याने काम केले. मात्र नेदरलँडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची त्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
अलीकडे अमोल क्रिकेट समालोचक म्हणून काम करतोय. या वर्षीच्या आयपीएलमध्ये त्याने राजस्थान रॉयल्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले.
भारतीय संघापर्यंत पोहोचणे सोपे आहे मात्र तिथे आपले स्थान टिकवून ठेवणे अवघड आहे असे कुणीतरी म्हटले आहे. अमोलच्या बाबतीत मात्र उलट झाले. त्याच्यासाठी भारतीय संघापर्यंत पोहोचणे अवघड होते. तिथपर्यंत गेला असता तर तो तिथे निश्चितच टिकून राहिला असता. तेवढी क्षमता त्याच्यामध्ये होती.
 
अमोलची प्रथम श्रेणी कारकीर्द
सामने १७१
धावा  १११६७
शतके ३०
अर्धशतके ६०

या लेखावरील आपल्या प्रतिक्रीया आपण @Maha_Sports या ट्विटर हॅडलवर तसेच 9860265261 या वाॅट्सअॅप क्रमांकावर नोंदवु शकता. 

क्रिकेटवरील “भारतीय क्रिकेटचे शापीत शिलेदार” लेखमालिकेतील काही खास लेख-

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग ११- पृथ्वी शॉ नावाचा हिरा शोधणारा जवाहिरी..

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १० – विस्मृतीत गेलेला अजय रात्रा

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ८ – आठवावा लागणारा निखिल चोप्रा

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!

-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर 

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर