भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..

-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund)

मुंबईचा संघ आणि त्यांचा देशांतर्गत स्पर्धांमधला दबदबा याबद्दल वेगळं काही सांगण्याची गरज नाही. गेली कित्येक वर्षे मुंबईने रणजी करंडकावर आपले वर्चस्व राखलेले आहे. अशा या मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळवणे जसे अवघड असते तसेच ते टिकवणेही अवघड असते. रणजीच्या २००५-०६ च्या हंगामात अशाच एका नवख्या खेळाडूचा मुंबई संघात समावेश करण्यात आला. त्याला दोन सामने खेळायला मिळाले. दोन्ही सामन्यांत त्याची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली. महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात तर तो दोन्ही डावांत शून्यावर बाद झाला. महाराष्ट्राने या सामन्यात मुंबईचा पाडाव केला. संघाला गरज असताना हा खेळाडू शून्यावर बाद झाला म्हणून तो ड्रेसिंग रूममध्ये आल्यावर कर्णधार निलेश कुलकर्णी, अमोल मुजूमदार, रमेश पोवार या ज्येष्ठ खेळाडूंनी त्याच्यावर अक्षरशः शिव्यांचा भडीमार केला. तुझी क्रिकेट खेळायची लायकी नाही असा ह्या सगळ्याचा सार होता असे म्हणूयात हवे तर. पहिलाच हंगाम, त्यात खराब कामगिरी, त्यात भर म्हणून ज्येष्ठांच्या शिव्या यामुळे निराश झालेला तो खेळाडू आपल्या रूममध्ये जाऊन ढसाढसा रडला. भरपूर रडून झाल्यावर त्याने आपले धैर्य एकवटून कर्णधार निलेश कुलकर्णीला मेसेज केला. त्यात त्याने लिहिले,

“तुम्ही मला ज्या पद्धतीने वागवले ते मी कधीही विसरणार नाही. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. एक दिवस मी मुंबईसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेन आणि संघाचा प्रमुख खेळाडू असेन.”

खरोखर काही वर्षांनी त्याने मुंबईचा प्रमुख खेळाडू म्हणून नाव कमावले. तो खेळाडू आहे अभिषेक नायर.

रणजीचा पहिला हंगाम वाईट गेल्यानंतर अभिषेक निराश झाला. आपले क्रिकेट संपले असा विचार करून त्याने क्रिकेट सोडून पानाचे दुकान टाकायचे ठरवले. तो आणि अजून दोन मित्र यांनी पैसे काढून पानाची घरपोच डिलिव्हरी द्यायची असा त्यांचा प्लॅन होता.

नियतीच्या मनात मात्र काही औरच होतं. नेमकी याच वेळेस त्याची गाठ ज्येष्ठ क्रीडा पत्रकार मकरंद वायगणकर यांच्याशी पडली.अभिषेकमधील गुणवत्ता त्यांना माहीत होती. एवढा गुणवान खेळाडू मुंबईने गमावू नये म्हणून वायगणकर त्याला तेंडुलकरकडे घेऊन गेले. तेंडुलकर तेव्हा अभिषेकला ओळखतही नव्हता. तरीही फक्त वायगणकर म्हणतात म्हणून त्याने अभिषेकला ४५ मिनिटे दिली. त्याला योग्य त्या टिप्स दिल्या. सचिनबरोबरच्या याच ४५ मिनिटांच्या मुलाखतीमुळे अभिषेकने आपल्यातील क्रिकेट पुन्हा एकदा अजमावून पाहण्याचे ठरवले आणि पुन्हा एकदा मुंबईच्या संघात स्थान मिळवले.

या वर्षी तरी आपल्याला संघात स्वीकारले जाईल अशी त्याला आशा होती. मात्र तसे झाले नाही. एका सामन्यात त्याला प्रशिक्षक प्रविण आम्रे यांनी नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला जाण्यास सांगितले. आदल्या वर्षीच्या तीन शून्यांपैकी दोन शून्य तो नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला गेला तेव्हाच आले होते. आता पुन्हा एकदा नाईट वॉचमन म्हणूनच फलंदाजीला जायचे होते. आता शून्यावर बाद झालो तर आपली धडगत नाही असा विचार करत अभिषेक फलंदाजीला गेला. नुसता गेलाच नाही तर ९७ धावाही काढल्या. पायात गोळे आल्यामुळे तो पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये आला.

त्याच सामन्यात मुंबईकडून गोलंदाजी करतानाही त्याला पायात गोळे आले. त्यामुळे म्हणा किंवा इतर काही कारण म्हणा, गोलंदाजीही फारशी प्रभावी झाली नाही. ड्रेसिंग रूमकडे परत येताना अमोल प्रशिक्षक आम्रे यांना म्हणाला,

“त्याला गोलदांजी येत नसेल तर घरी बसायला सांगा.”

अभिषेकने ९७ धावा करूनही त्याच्या पदरी अपमानच आला. त्या दिवशी पुन्हा आपल्या रूममध्ये जाऊन तो मनसोक्त रडला. हे अपमान सत्र एवढ्यावरच थांबले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात अमोलने त्याला गोलंदाजीच दिली नाही. निराश झालेला अभिषेक प्रशिक्षकांकडे गेला आणि त्यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले. आपल्याला गोलदांजी करायला द्यावी असे त्याने अमोलला सांगावे अशी त्याने विनंती केली.

अखेरीस अमोलने लंचनंतरचे पहिले षटक त्याला टाकायला लावले. अभिषेकने आपल्या पहिल्याच चेंडूवर बळी मिळवला. त्याचा आनंद पुढचे पाचच चेंडू टिकला. त्या षटकानंतर अमोलने त्याला परत गोलदांजी दिलीच नाही. तरीही अभिषेक निराश नव्हता. आज कमीतकमी आपण रडत तरी नाही एवढेच काय ते त्याला समाधान होते. त्या हंगामात अभिषेकने ५ सामन्यांत ५०४ धावा काढल्या आणि १५ बळीदेखील मिळवले. याच हंगामातल्या एका सामन्यात त्याचा खेळ पाहून अजित आगरकरने त्याची मनसोक्त स्तुती केली. हंगामाच्या शेवटी संपूर्ण संघाला दाखवण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये रमेश पोवारने अभिषेकची माफी मागितली. तिथून पुढे पुढची काही वर्षे अभिषेकने मागे वळून पाहिलेच नाही.

आयपीएलचा पहिला हंगाम (२००८) अभिषेक मुंबईकडून खेळला. पुढच्या वर्षी २००९ मध्ये मुंबईकडून रणजीच्या अंतिम सामन्यात त्याने ९९ धावा करत मुंबईच्या विजयात हातभार लावला. त्यावर्षीच्या आयपीलच्या दुसऱ्या हंगामातही त्याने चांगली कामगिरी केली. मुंबई इंडियन्सकडून केलेल्या काही स्फोटक खेळींमुळे आणि त्याच्या गोलंदाजीमुळे त्याचा भारतीय संघात समावेश झाला. मात्र इथेही नशिबाने त्याची साथ दिली नाही. भारताकडून त्याला फक्त तीन एकदिवसीय सामन्यांत संधी मिळाली. यातल्या दोन सामन्यांत त्याला फलंदाजी करण्याची वेळच आली नाही आणि तिसऱ्या सामन्यात तो शून्य धावांवर नाबाद राहिला. एका सामन्यात केलेल्या गोलंदाजीतही तो बळी मिळवू शकला नाही. आपली पहिली मालिका खेळणाऱ्या कुठल्याही खेळाडूला स्वतःला सिद्ध करण्याची खुमखुमी असते. संधी मिळताच आपण या जागी कसे योग्य आहोत हे दाखवण्याची तडफ असते. अभिषेकला त्याच्या पहिल्या मालिकेत अशी संधी मिळलीच नाही. त्यामुळे पुढच्या मालिकेसाठी त्याला संघातून वगळण्यात आले.

अभिषेक संघाबाहेर जाण्यासाठी अजूनही एक कारण होते. भारतीय संघात स्थान टिकवण्यासाठी कर्णधाराचा तुमच्यावर आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास असणे फार गरजेचे असते. अभिषेकच्या बाबतीत नेमके हेच होऊ शकले नाही. “अभिषेक हा चांगली फलंदाजी करणारा गोलंदाज आहे की चांगली गोलदांजी करणारा फलंदाज आहे हेच मला समजत नाही.” असे वक्तव्य कर्णधार धोनीने केले. या वक्तव्याचा आधार घेत एका वर्तमानपत्राने अभिषेकवर लेख लिहिला आणि तिथेच अभिषेकाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपल्यात जमा झाली.

भारताकडून पुन्हा कधीतरी खेळण्याची संधी मिळेल या आशेवर अभिषेक मुंबईकडून खेळत राहिला. मुंबईने २०१३ मध्ये मिळवलेल्या रणजी विजेतेपदात अभिषेकचा सिंहाचा वाटा होता. त्या हंगामात त्याने ३ शतके आणि ८ अर्धशतकांच्या मदतीने ९६६ धावा केल्या. पहिल्या हंगामात झालेल्या अपमानानंतर निलेश कुलकर्णीला पाठवलेला मेसेज अभिषेकने आता खरा करून दाखवला. मुंबईच्या २०१६ च्या रणजी विजेतेपदातही अभिषेकचा मोठा वाटा होता. त्याच्या पुढच्या वर्षीच्या (२०१६-१७) हंगामातही त्याने जोरदार कामगिरी करत १० सामन्यांत ५८८ धावा केल्या. त्यावर्षी गुजरातने मुंबईला अंतिम सामन्यात हरवत विजेतेपद पटकावले. आता अभिषेक मुंबईच्या संघातील ज्येष्ठ खेळाडू झाला होता. श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड यांच्यासारखे खेळाडू त्याच्याकडे सल्ला मागू लागले. कामगिरी खराब झाली तर अभिषेक त्यांना चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहित करत होता.

दरम्यान मुंबईकडून त्याने ९९ प्रथम श्रेणी सामने खेळले. आपल्या ९९ व्या सामन्यातही त्याने चांगली कामगिरी केली. मुंबईचा पुढचा सामना वानखेडेवर होता. अभिषेकला आपला शंभरावा सामना आपल्या घरच्या मैदानावर खेळायला मिळणार असे वाटत असतानाच त्याला संघातून डच्चू देण्यात आला. त्या हंगामात पुन्हा त्याला मुंबईकडून खेळण्याची संधी मिळालीच नाही. ती पुन्हा कधीही मिळणार नव्हती. ज्या पद्धतीने आपल्याला संघातून काढण्यात आले त्याबद्दल अभिषेकला निश्चितच वाईट वाटले. त्यांनतर तो भरपूर क्लब क्रिकेट, कंपनी क्रिकेट खेळला. तिथे चांगली कामगिरी देखील केली. मात्र तरीही त्याला मुंबईकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. अखेरीस हृदयावर दगड ठेवत त्याने यावर्षीच्या हंगामात पॉंडिचेरीचा रस्ता धरला. आपला शंभरावा प्रथम श्रेणी सामना त्याने पॉंडिचेरीकडून खेळला. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून १०० प्रथम श्रेणी सामने खेळणे हे वाटते तितके सोपे नाही.संघात स्थान मिळवण्यासाठीची धडपड ते मिळालेले स्थान चांगली कामगिरी करत टिकवणे आणि १०० सामने खेळणे ही मोठ्या कौतुकाची गोष्ट आहे..ती अभिषेकने साध्य केली.

खेळाडू म्हणून मुंबईकडून उत्तम कामगिरी केलेला अभिषेक लहान मुलांसाठी क्रिकेट प्रशिक्षण अकादमीदेखील चालवतो. यातूनच त्याच्यातल्या प्रशिक्षणाच्या गुणांना वाव मिळत गेला. वर म्हटल्याप्रमाणे मुंबईच्या खेळाडूंना वेळोवेळी तो मार्गदर्शन करू लागला. मध्यंतरी रोहित शर्मा फॉर्ममध्ये नसताना तो अभिषेककडेच मदतीला गेला. अभिषेकने रोहितकडून अनेक विचित्र गोष्टी करून घेतल्या. यात अगदी चिखलात पाय बुडवत चालण्यापासून ते घमेली भरून माती वाहण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होता. रोहितला आपल्या कंफर्ट झोनमधून बाहेर काढण्यासाठीची अभिषेकची ती युक्ती होती. यावर्षी अभिषेक मुंबईऐवजी पॉंडिचेरीकडून खेळणार हे समजल्यावर रोहितने भावनिक ट्विट करत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.

भारतीय क्रिकेट संघासाठी यंदाच्या वर्षातील आठवणीत राहणाऱ्या विजयांची यादी करायची म्हटलं तर निदाहास ट्रॉफीमध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटच्या षटकात मिळवलेला विजय अनेकांना आठवेल. अखेरपर्यंत रंगलेल्या या थरारक लढतीत दिनेश कार्तिकने कमाल केली. शेवटच्या चेंडूवर ४ धावांची आवश्यकता असताना षटकार मारत त्याने बांगलादेशी खेळाडूंची नागीण डान्स करायची संधी हिसकावून घेतली. भारताच्या या विजयानंतर डिकेचा जोरदार बोलबाला झाला. एक फिनिशर म्हणून त्याचे नाव घेतले जाऊ लागले. डिकेचा हा उदय अचानक झालेला नाही. त्यामागे कठोर मेहनत आणि ती मेहनत करून घेणारा एक गुरू आहे. तो गुरू म्हणजेच अभिषेक नायर.

त्यानंतर लगेचच कोलकता नाईट रायडर्स संघाने अभिषेकची आपल्या क्रिकेट अकादमीच्या प्रशिक्षकपदी निवड केली. अभिषेक सध्या पॉंडिचेरीकडून क्रिकेट खेळतोय. आपल्यात अजूनही एक दोन वर्षाचे क्रिकेट शिल्लक आहे असे त्याला वाटते. वरकरणी पहायला गेलं तर अभिषेकची आकडेवारी काही खूप उच्च आहे असे नाही. मात्र वेळोवेळी आपल्या अष्टपैलू खेळीने त्याने संघाची मदत केलेली आहे. भरपूर गुणवत्ता असूनही कर्णधाराच्या एका वक्तव्याने अभिषेकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द बहरू शकली नाही. आपण अनेकदा एखाद्या खेळाडूकडे पाहून म्हणतो,

“अरे यार. याला अजून थोडी संधी मिळायला पाहिजे होती.”

अभिषेकचा समावेश अशाच काही संधी न मिळालेल्या शापित शिलेदारांमध्ये इथून पुढेदेखील होत राहील.

अभिषेकची कारकिर्द

प्रथम श्रेणी
सामने – १०३
धावा – ५७४९
बळी – १७३