भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४- दैव देते, कर्म नेते!!

-आदित्य गुंड ([email protected])

रवी शास्त्री त्याला डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या नावावरून ‘डोनाल्ड’ अशी हाक मारत असे. एकदा स्थानिक सामन्यात फलंदाजी करताना ऐन सामन्यात त्याने गोलंदाजाला थांबवून पतंग उडवला होता. आपल्या पहिल्या रणजी सामन्यात पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार ठोकला होता. भारतीय खेळाडूंच्या कसोटीमधील धावांच्या सरासरीत आजही त्याची सरासरी सगळ्यात जास्त आहे.

तो भारताकडून १९ वर्षाखालील आशिया करंडकामध्ये गांगुली, जडेजा यांच्याबरोबर खेळला होता. रणजी करंडकाच्या उपांत्य सामन्याअगोदर एक दिवस त्याच्या आईचे निधन तरीही त्याने तो सामना खेळत ७५ धावा केल्या होत्या. दर्दी क्रिकेटरसिकांना त्याचे नाव सांगण्याची गरज नाही. तो होता विनोद गणपत कांबळी.

विनोद कांबळी म्हटलं की बऱ्याच जणांना त्याची आणि सचिनची ६६४ धावांची विश्वविक्रमी भागीदारी आठवते. मात्र त्याच सामन्यात विनोदने ३७ धावा देत ६ बळीदेखील मिळवले होते हे कमी जणांना माहित असते. शालेय क्रिकेटमध्ये गुणवत्ता दाखवल्यामुळे लवकरच विनोदची मुंबईच्या रणजी संघात निवड झाली.

रणजी संघात लवकर आलेल्या विनोदला भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी मात्र तीन वर्षे थांबावे लागले. १९९३ साली इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने कसोटी पदार्पण केले. विनोदबरोबर शाळेत क्रिकेट खेळलेला सचिन १९८९ पासून कसोटी संघात होता. त्यावेळी ‘सचिनने लिफ्ट पकडली तर मी मात्र जिना चढून आलो’ असे विधान करून त्याने वाद निर्माण केला होता.

आपल्या पहिल्या सामन्यात विनोदने दोन्ही डावात १६ आणि १८ अशा धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्याच सामन्यात विनोदने कसोटीमधील आपले पहिले अर्धशतक झळकावले होते. याच डावात सचिनने आणि सिद्धूने शतके काढल्याने विनोदचे हे अर्धशतक लक्षात न राहण्याजोगेच राहिले. तिसऱ्या कसोटीमध्ये मात्र विनोदने आपणही कमी नाही असे दाखवत द्विशतक ठोकले.

त्याच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने ५९१ धावांचा डोंगर उभारला होता. या द्विशतकाची एक आठवण विनोदने एका कार्यक्रमात सांगितली होती. हे द्विशतक करण्याअगोदर विनोदने भारतीय संघाचा त्या वेळचा फिजिओ अली इराणी याच्याकडे माधुरी दिक्षितला भेटवण्यासाठी आग्रह धरला होता. अलीने मजेत त्याला म्हटले होते,

“तू डबल सेंचुरी मार. मग भेटवतो.”

कांबळीने खरोखर द्विशतक मारल्यानंतर अली त्याला घेऊन माधुरीच्या घरी ब्रेकफास्टला गेला होता.

विनोद भारताकडून १७ कसोटी सामने खेळला. आपल्या पहिल्या ७ सामन्यांमध्येच त्याने २ द्विशतके आणि २ शतके ठोकली होती. यातली द्विशतके त्याने लागोपाठच्या सामन्यांमध्ये काढली होती. आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये विनोदने १०८४ धावा काढल्या.

एक वेळ त्याची कसोटीमधील सरासरी ११३ एवढी होती. सुरुवातीच्या सामन्यांत आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवलेल्या विनोदला नंतर मात्र उसळत्या, वेगवान चेंडूंचा सामना करायला झगडावे लागले. १९९४ मध्ये भारताच्या दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिज संघाच्या कोर्टनी वॉल्शने त्याच्यावर उसळत्या चेंडूंचा मारा करून त्याला चांगलेच सतावले होते. आपल्या कच्च्या गोष्टींवर विनोदने कधी काम केलेच नाही. याउलट बॅटचे हॅण्डल जाड हवे म्हणून विनोद त्यावर ९ ग्रिप लावून खेळत असे. साहजिकच त्याची बॅटवरची पकड योग्य नसे.

१९९५ साली वयाच्या फक्त २३ व्या वर्षी विनोद आपला शेवटचा कसोटी सामना खेळला. त्यावेळी त्याची धावांची सरासरी होती ५४.२०! १९९५ साली कसोटीमध्ये ५४ ची सरासरी म्हणजे किती मोठी गोष्ट हे क्रिकेटच्या जाणकारांना सांगण्याची गरज नाही. अलीकडच्या काळातल्या अॅडम् वोग्ज (६१.८७), स्टीव्ह स्मिथ (६१.३७), कुमार संगकारा (५७.४०), जॅक कॅलिस (५५.३७) या फक्त चार खेळाडूंची कसोटीमधली सरासरी विनोदच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगात १००० धावा करण्याचा विक्रमही विनोदच्या नावावर आहे.

विनोदची एकदिवसीय कारकीर्द जवळजवळ १० वर्षांची होती. या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये विनोद सतत संघात आत बाहेर करत होता. भारताकडून खेळलेल्या १०४ एकदिवसीय सामन्यांत ३२ च्या सरासरीने त्याने २४७७ धावा काढल्या. यात २ शतकांचाही समावेश होता. यातले पहिले शतक त्याने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी केले होते तर दुसरे आणि शेवटचे शतक त्याने ९६ च्या विश्वकरंडकात झिम्बाब्वे विरुद्ध केले होते.

३ बाद ३२ वर खेळायला येऊन त्याने शतक करत भारताला २४७ धावा करण्यास मदत केली होती. भारताने तो सामना जिंकला होता. याच विश्वकरंडकात श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ८ बाद १२० वर सामना थांबवण्यात आला तेव्हा मैदानातून रडत बाहेर पडलेला विनोद आजही लोकांना आठवतो. या सामन्यानंतर विनोदला एकदिवसीय संघात आपले स्थान टिकवणे अवघडच गेले. २००९ साली त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

लहानपणी विनोद जिथे क्रिकेट खेळायचा ती जागा उंचच उंच इमारतींच्या मधोमध होती. जागा कमी असल्यामुळे आपल्या गल्ली क्रिकेटचे जसे नियम असतात तसेच काहीसे नियम त्यांचे असत. यातलाच एक नियम म्हणजे जो फलंदाज इमारतीमध्ये जास्तीत जास्त उंचावर चेंडू मारेल त्याला जास्त धावा मिळतील. या नियमामुळे बॉल उंच टोलवायची सवय लागलेल्या विनोदने आपली ही सवय नंतरही कायम ठेवली होती. एका सामन्यात विनोदने शेन वॉर्नला एका षटकात २२ धावा कुटल्याचे बऱ्याच जणांना आठवत असेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तरी विनोद मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत राहिला. मुंबईकडून खेळलेल्या १२९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने ५९ च्या सरासरीने ९९६५ धावा काढल्या. यात ३५ शतके आणि ४४ अर्धशतकांचा समावेश होता. २००० साली वयाच्या २८ व्या वर्षी त्याने रणजी, दुलिप आणि देवधर करंडकात मिळून ५ शतके काढली होती. भारतीय संघातून बाहेर असलेल्या विनोदची ही पुनरागमन करण्यासाठीची धडपड होती.

२००२ सालचा हंगाम विनोद दक्षिण आफ्रिकेतल्या बोलँड क्रिकेट बोर्डाकडून खेळला. दक्षिण आफ्रिकेतल्या उसळत्या खेळपट्ट्यांवर खेळायचा सराव करून आपली कच्ची बाजू सुधारण्याचा त्याचा तो प्रयत्न होता. तोपर्यंत अर्थात खूप उशीर झाला होता. आता तर मुंबईच्या संघातही त्याला स्थान नव्हते. बरीच वर्षे मुंबईकडूनही दुर्लक्षित राहिल्यावर २०११ साली त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

मुंबई क्रिकेटची इतकी वर्षे सेवा करूनही निवड समितीने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याने आपण निवृत्ती घेत आहोत अशी तक्रार त्याने त्यावेळी केली होती. निवृत्तीनंतर विनोदने खेल भारती नावाने क्रीडा अकादमी सुरु केल्याच्या बातम्या होत्या. त्याचे पुढे काय झाले याबद्दल काही कळले नाही.

आपल्या फलंदाजीबरोबरच आपल्या विशिष्ट प्रकारच्या दाढीने आणि गळ्यातील सोन्याच्या चेनमुळे विनोद अनेकांच्या लक्षात राहिला. त्याची ती फ्रेंच बिअर्ड अनेकांनी कॉपी केल्याचे आठवते. कधी काळी त्याच्या गळ्यात “किस मी. आय एम द प्रिन्स” असे लिहिलेले पेंडंट होते असे म्हणतात. गुणवत्ता अंगात ओतप्रोत भरलेली असूनही आपल्या खेळाबाबत विनोद गंभीर नव्हता असे बऱ्याच जणांचे म्हणणे होते.

आतंरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारा एखादा खेळाडू आपल्या खेळाबाबत गंभीर नसणे ही बाब न पटण्याजोगी आहे. विनोदच्या दारू पिण्याच्या सवयीने त्याचा घात केला असेही काहीजण म्हणतात. दौऱ्यावर असताना हॉटेलमध्ये चेक इन केले की विनोद त्याच्या बॅगमधून साईबाबांचा फोटो आणि दारूची बाटली बाहेर काढत असे एका मुंबईच्या खेळाडूने मागे एकदा सांगितले होते.

या सगळ्याला उत्तर म्हणून “मला कुणी मी चुकतोय हे सांगितलेच नाही.” असे विनोद सतत म्हणत असे. आपण चुकतोय हे त्याचे त्यालाच कळू नये हे किती दुर्दैव!! विनोदची सिगारेटची तल्लफ किती तीव्र असे याचा एक किस्सा माझ्या एका सहकाऱ्याने सांगितला होता. एकदा भारतीय संघ दिल्ली एअरपोर्टवर असताना विनोदला सिगारेट ओढण्याची इतकी इच्छा झाली की स्वतःकडे सिगारेट नसताना तो स्मोकिंग झोनमध्ये गेला. तिथे अगोदर सिगारेट ओढणाऱ्या माझ्या सहकाऱ्याकडून त्याने सिगारेट मागून घेतली आणि स्वतःची तल्लफ शमवली.

निवृत्तीनंतर प्रसिद्धीच्या झोतापासून दूर गेलेल्या विनोदने एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत १९९६ च्या विश्वकरंडकात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आपल्या त्यावेळच्या संघ सहकाऱ्यांवर त्याने या निर्णयावरून टीका केली होती. नाणेफेक जिंकल्यास प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय झालेला असतानाही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेल्याने आपल्याला धक्का बसल्याचे त्याने नमूद केले होते.

या सामन्यामुळे आपली कारकीर्द संपली असा आरोप त्याने त्यावेळी केला होता. प्रत्यक्षात या सामन्यानंतरही विनोदने ३५ एकदिवसीय सामने खेळले होते. त्यामुळे या आरोपात तसे फारसे तथ्य नव्हते. विनोदच्या या आरोपांवरून त्याच्यावर टीका तर झालीच आणि त्याचे हसेही झाले. हे प्रकरण शांत झाल्यानंतर विनोदने सचिनवर टीकेची राळ उठवली. सचिनने आपल्याला साथ न दिल्याने आपली कारकीर्द अयशस्वी राहिली असा आरोप त्याने सचिनवर केला होता. याही आरोपाने त्याने स्वतःची प्रतिमा खराब करून घेतली.

मध्यंतरी डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे कर्ज थकविल्या कारणाने बँकेने त्याला नोटीस बजावली होती. त्यामुळेदेखील विनोदची बरीच नाचक्की झाली. क्रिकेटपासून दूर असताना विनोदने चित्रपटातही आपले नशीब अजमावून पाहिले. आजपर्यंत त्याने तीन चित्रपटात काम केले आहे. मागे एकदा कुठल्याश्या रिऍलिटी डान्स शोमध्येदेखील विनोदचा सहभाग होता. २००९ च्या निवडणुकीत विनोदने लोक भारती पार्टीकडून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि पराभूतही झाला होता.

या ना त्या कारणाने वाद निर्माण करून विनोद कारकिर्दीच्या सुरुवातीपासून सतत चर्चेत राहिला. ९२ च्या विश्वकरंडकात चिअर गर्ल्सबरोबर नाचला म्हणून, कधी मुंबई संघाच्या सरावाला गैरहजर राहिला म्हूणन, कधी सचिनने आपल्या निवृत्तीच्या भाषणात आपले नाव घेतले नाही म्हणून, तर कधी आपल्या घरच्या कामवाल्या बाईला मारहाण केली म्हणून.

अगदी परवा त्याने संजू सॅमसनच्या क्षमतेबद्दल प्रश्चचिन्ह उपस्थित करून ट्विटरवर वाद ओढून घेतला होता. कधीकाळी जाणकारांनी सचिनपेक्षा जास्त गुणवत्ता असलेला खेळाडू असे कौतुक केलेल्या विनोदने स्वतः आपली कारकीर्द वादग्रस्त बनवली. गुणवान खेळाडूने काय नाही केले पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणून विनोदचे नाव घेता येईल. या सगळ्या घटनांमुळे आजही “मला विनोद कांबळी आवडतो.” असं कुणी म्हटल्याचं मला आठवत नाही.

अलीकडे विनोद आणि सचिनमध्ये असलेले वाद मिटल्याचे दिसते. मुंबई टी-२० लीगच्या एका कार्यक्रमात सचिन आणि विनोद हास्यविनोद करताना दिसले होते. परवा सचिनच्या वाढदिवसानिमित्त विनोदने त्याला ट्विटरवरुन गाणे गाऊन शुभेच्छा दिल्या होत्या.

मुंबई टी-२० लीगमध्ये शिवाजी पार्क लायन्स संघाचा मेंटॉर म्हणून विनोदने काम केले होते. गेल्या आठवड्यात विनोदने कोकणात नारायण राणेंच्या मुलाच्या मदतीने क्रिकेट अकादमी सुरु केल्याची बातमी वाचनात आली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसीच्या अकादमीमध्येही त्याने प्रशिक्षक म्हणून काम सुरु केले आहे. प्रशिक्षक म्हणून आपली सेकंड इनिंग सुरु करणाऱ्या विनोदची रुळावरून घसरलेली या निमित्ताने तरी पुन्हा एकदा रुळावर येईल अशी अपेक्षा.

विनोदची कारकीर्द

एकदिवसीय
सामने – १०४ धावा – २४७७ शतके – २ सरासरी – ३२.५९

कसोटी
सामने – १७ धावा – १०८४ शतके – ४ सरासरी – ५४.२०

प्रथम श्रेणी
सामने – १२९ धावा – ९९६५ शतके – ३५ सरासरी – ५९.६७

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार या मालिकेतील अन्य लेख-

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १- पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २- एक स्कॉलर खेळाडू

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३- वन मॅच वंडर 

आपल्याला हा लेख कसा वाटला याबद्ल आपण आपल्या प्रतिक्रिया महा स्पोर्ट्सच्या ट्विटर किंवा फेसबुक पेजवर नक्की कळवा. 

ट्विटर आयडी- @Maha_Sports

फेसबुक- Maha Sports महा स्पोर्ट्स 

लेखकाचा ट्विटर आयडी- @adityagund