वरळी स्पोर्टस् क्लब कबड्डी स्पर्धेत पंचगंगाचा धुव्वा उडवून भवानीमाता संघाचे मोसमातील तिसरे विजेतेपद

मुंबई: अवघ्या 15 मिनीटांच्या अवधीत उपांत्य आणि अंतिम सामना खेळणाऱया भवानीमाता क्रीडा मंडळाने थकव्याला दूर करून जेतेपदाच्या लढतीत पंचगंगा सेवा मंडळाचा 33-17 असा फडशा पाडत वरळी स्पोर्टस् क्लब आयोजित द्वितीय श्रेणी कबड्डी स्पर्धा जिंकली.

गेल्या महिन्याभरात भवानीमाताने हिंदमाता कबड्डी, आगरी कबड्डी आणि आता वरळी स्पोर्टस् क्लब कबड्डी अशा तीन स्पर्धांत बाजी मारण्याचा पराक्रम केला.

वरळी स्पोर्टस् क्लबच्या कबड्डी स्पर्धेचा शेवटचा दिवस कबड्डीप्रेमींना फार थरार देऊ शकला नाही. ज्या लढतीसाठी दर्दी कबड्डीप्रेमींनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती, त्यांचा अक्षरशा अपेक्षाभंग झाला.

उपांत्य लढतीत 9-15 ने पिछाडीवर असूनही संतोष सावंत यांच्या भवानीमाता संघाने उत्तरार्धात संयमाने खेळ करीत जयभारत सेवा संघावर 27-20 अशी मात करीत अंतिम फेरीत धडक मारली.

संघषपूर्ण उपांत्य लढतीतील विजयानंतर अवघ्या 15 मिनीटांत भवानीमाता अंतिम फेरीसाठी सज्ज झाले. उपांत्य फेरीच्या लढतीत भवानीमाताच्या खेळाडूंचा चांगलाच घामटा निघालेला.

त्यामुळे दीड तास विश्रांती करून मैदानात उतरलेल्या पंचगंगाचे पारडे जड वाटत होते, पण अंतिम सामन्याच्या प्रारंभापासूनच भवानीमाताच्या सुशांत धाडवे, ओमकार नारकर आणि कल्पेश पवारच्या आक्रमक आणि जबरदस्त खेळाने पंचगंगाला पहिल्या दहा मिनीटांतच जोरदार पंच लगावले.

13 व्या मिनीटाला लोण चढवत आघाडी घेणाऱया भवानीमाताने मध्यंतराला 15-8 अशी निर्णायक आघाडी घेतली होती.

पहिल्या उपांत्य सामन्यात जय ब्राह्मणदेवचा 51-11 असा धुव्वा उडविताना पंचगंगाच्या नितेश सावंत, मनोज वार्डे आणि रवी साळुंखेने चढाया-पकडींचा जोरदार खेळ दाखविला होता.

त्यांनी पाच लोण चढवत आपल्या गुणांचे अर्धशतकही ओलांडले होते. त्यामुळे सुपर फॉर्मात असलेल्या पंचगंगाच्या सर्वच खेळाडूंनी निराश केले. त्यांच्या चढाईपटूंना भवानीमाताच्या रक्षकाचे कडे भेदताच आले नाही.

चढाईत चपळता दाखवणाऱया सुशांतने काही अफलातून पकडी करून भवानीमाताची जेतेपदाच्या दिशेने आगेकूच कायम ठेवली. उत्तरार्धातही भवानीमाताने आपल्या गुणांचा जयघोष कायम ठेवत 33-17 अशा सहज आणि सोप्या विजयासह मोसमातील तिसऱ्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

अंतिम सामन्यात तुफान खेळ करणारा अष्टपैलू सुशांत धाडवे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला तर भवानीमाता संघाचाच ओमकार नारकर सर्वोत्तम पकडवीर ठरला. पंचगंगाच्या रविंद्र साळुंखेने सर्वोत्तम चढाईबहाद्दराचा मान मिळविला.

विजेत्या भवानीमाता संघाला रोख 21 हजार रूपये आणि झळाळता चषक देऊन गौरविण्यात आले तर उपविजेत्या पंचगंगाला 15 हजार रूपयांचा पुरस्कार मिळाला.

या दिमाखदार स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा वरळी स्पोर्टस् क्लबचे सरचिटणीस अभय हडप, कोषाध्यक्ष मिलिंद ब्रह्मे, स्पर्धाप्रमुख राजेश सॅमसन,विश्वस्त दिगंबर सायवे, वरळी स्पोर्टस् क्लबचे पदाधिकारी तसेच कबड्डी संघटनक चंद्रशेखर राणे, चंद्रकांत भारती उपस्थित होते. स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल स्पर्धाप्रमुख राजेश सॅमसन यांचे क्लब तसेच कबड्डी संघटनेनेही तोंडभरून कौतुक केले.

त्याअगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात पंचगंगाने अप्रतिम खेळ करीत जय ब्राह्मणदेवची धुळधाण उडवली. या एकतर्फी सामन्यात पंचगंगाने 25-4 अशी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला होता.

मग उत्तरार्धातही जोशपूर्ण खेळ करीत त्यांनी 51-11 असा 40 गुणांनी मोठा विजय नोंदविला. पहिला सामना कंटाळवाणा झाला असला तरी दुसऱ्या उपांत्य सामन्याने प्रेक्षकांची मने जिंकली.

जयभारतने आकाश चव्हाणच्या वेगवान चढायांमुळे भवानीमातावर पहिल्या दहा मिनीटातच लोण चढवत पहिल्या डावांत 15-9 अशी आघाडी घेतली. मात्र मध्यंतरानंतर सुशांत धाडवे आणि ओमकार नारकरने सामन्याचा रंग पालटवला.

त्यांनी एकेक गुणांचा सपाटा लावत फक्त पिछाडीच भरून नाही काढली तर आघाडीही घेतली. तसेच जयभारतच्या चढाईपटूंची वारंवार पकड करीत त्यांना त्यांची गुणसंख्याही वाढवू दिली नाही.

शेवटच्या 14 मिनीटात जयभारतला आपल्या खात्यात केवळ एकाच गुणाची भर घालता आली. मात्र भवानीमाताने आपला गुणफलक 12 वरून 27 वर नेण्याची करामत करून दाखवली.