भुवनेश्वर कुमारच्या लग्नाची तारीख ठरली !

दिल्ली । भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आपल्या जीवनातील आणखी एक इंनिंग लवकरच सुरु करणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी भुवनेश्वर कुमार मेरठ शहरात प्रेयसी नुपूरसोबत लग्न बंधनात अडकणार आहे.

२३ नोव्हेंबरला लग्न झाल्यावर त्याने दोन वेळा रिसेप्शन आयोजित केले असून २६ नोव्हेंबर रोजी बुलंदशहरात तर ३० नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे हा सोहळा होणार आहे.

इंडिया टाइम्सशी बोलताना भुवनेश्वर कुमारचे वडील म्हणाले, ” भुवीचे लग्न मेरठ शहरात होणार असून भुवनेश्वरला संघसहकाऱ्यांनाही या कार्यक्रमासाठी बोलवायचं असल्यामुळे त्याने दिल्ली शहरात खास रिसेप्शन ठेवायचा आग्रह केला. ३० नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतीय संघ दिल्ली शहरात तिसऱ्या कसोटीसाठी आलेला असेल. “

भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामना येथे २० ते २८ नोव्हेंबर रोजी खेळणार आहे. याच काळात भूवीचे लग्न आणि पहिले रिसेप्शन होणार आहे.

तिसरा कसोटी सामना दिल्ली शहरात २ ते ६ डिसेंबर रोजी होणार आहे. या सर्व तारखांच्या घोळामुळे भुवनेश्वर या कसोटी मालिकेत भाग न घेण्याची दाट शक्यता आहे. याची कोणतीही अधिकृत घोषणा मात्र बीसीसीआयकडून करण्यात आली नाही.