आयपीएलमध्ये जागा न मिळालेल्या खेळाडूचा शतकातील सर्वोत्तम झेल घेण्याचा प्रयत्न, पहा व्हिडिओ

ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या बीग बॅश लीगमध्ये न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलमने ब्रिस्बेन हिट संघाकडून खेळताना पर्थ स्कॉचर्सविरुद्ध जवळजवळ एका हाताने अफलातून झेल घेतला होता. पण अखेरच्या क्षणी त्याच्या हातातून चेंडू निसटला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेला पर्थच्या डावातील 14 व्या षटकात ही घटना घडली. त्यावेळी जोश ललोर गोलंदाजी करत असताना त्याच्या पाचव्या चेंडूवर मिशेल मार्शने लाँग ऑनच्या दिशेला चेंडू फटकावला. त्यावेळी मॅक्यूलम तिथे क्षेत्ररक्षणासाठी उभा होता.

त्याने त्याच्या डाव्या बाजूला फुल लेंथमध्ये उडी मारत डाव्या हाताने हवेत असतानाच चेंडू पकडला होता. मात्र शेवटच्या क्षणी तो चेंडू खाली पडला आणि मार्शला जीवदान मिळाले.

मॅक्यूलमच्या या झेलचा व्हिडिओ बीग बॅश लीगच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘ब्रेंडन मॅक्यूलमने फिफा विश्वचषकात न्यूझीलंडचा नवीन गोलकीपर व्हायला हवे.’

त्याचा हा अफलातून झेल घेण्याचा प्रयत्न पाहून फॉक्स स्पोर्ट्सचे समालोचक मेल जोन्स यांनी म्हटले की ‘हा शतकातील सर्वोत्तम झेल झाला असता.’

या झेल घेण्याच्या प्रयत्नाआधी या सामन्यात मॅक्यूलमने कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टचा झेल घेतला होता. हा झेलही त्याने सूर मारत सुरेखरित्या घेतला होता.

या सामन्यात पर्थ संघाला 20 षटकात 6 बाद 135 धावाच करता आल्या. ब्रिस्बेन संघाकडून मुजीब उर रेहमानने उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन करताना 4 षटकात फक्त 10 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

पर्थने दिलेल्या 136 धावांचे आव्हान ब्रिस्बेन संघाने 18.2 षटकातच 5 विकेट्स गमावत पूर्ण केले. अफलातून क्षेत्ररक्षण करणाऱ्या मॅक्यूलमला फलंदाजीमध्ये मात्र विशेष काही करता आले नाही. त्याने या सामन्यात 14 धावा केल्या.

मॅक्यूलमवर आयपीएल 2019 साठी कोणत्याच संघानी बोली लावण्यास पसंती दाखवली नाही. त्यामुळे तो पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताचा स्टार फुटबाॅलपटूने लिओनेल मेस्सीला टाकले मागे

वाढदिवस विशेष: १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास १० गोष्टी

Video: विराट कोहलीपाठोपाठ हार्दिक पंड्याचाही मैदानात डान्स