लग्नाची इच्छा व्यक्त करणे भारताला पाकिस्तानची गुप्त माहिती पुरवण्यापेक्षा मोठा गुन्हा आहे का? – इम्रान खान

पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि राजकीय क्षेत्रातील मोठे प्रस्थ इम्रान खान यांच्या तिसऱ्या लग्नावरून उठलेले वादळ शांत व्हायचे नाव घेत नाही. त्यांनी यापूर्वीच आपल्या तिसऱ्या लग्नाच्या वृत्ताचे खंडन केले आहे. तसेच मीडियामध्ये येत असलेल्या चुकीच्या वृत्तांवरही टीका केली आहे.

इम्रान खान आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ” मी ३ दिवसांपासून विचार करतोय की मी बँक लुटली आहे की मी पैशांचा काही काळाबाजार केला आहे? मी पाकिस्तानची कोणती गुप्त माहिती भारताला पुरवली आहे का? मी यातलं काहीही केलं नाही. मी यापेक्षा मोठा गुन्हा केला आहे तो म्हणजे मी तिसरं लग्न करायची इच्छा व्यक्त केली आहे. “

तब्बल ६ ट्विट करून इम्रान खान यांनी नवाज शरीफ यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यातील ५व्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ” मला शरीफ यांचे वैयक्तिक जीवन गेले ४० वर्ष माहित आहे परंतु मी कोणत्याही खालच्या पातळीवर जाऊन यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. “

इम्रान खान हे पाकिस्तानचे विश्वविजेते कर्णधार आहेत. त्यांनी पाकिस्तानकडून ८८ कसोटी आणि १७५ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी कसोटीत ३८०७ धावा आणि ३६२ विकेट्स घेतल्या आहेत तर वनडेत ३७०९ धावा आणि १८२ विकेट्स घेतल्या आहेत. ते पाकिस्तानचे दिग्गज माजी क्रिकेटपटूंपैकी एक समजले जातात.