एवढा मोठा क्रिकेट फॅन पाहिलाय का??

पुणे । आज महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक रणजी सामन्यात आज एक क्रिकेटप्रेमी जोरजोरात कर्नाटक टीमला पाठिंबा देत होता. सामना पुण्यात असल्यामुळे आणि हा चाहता कन्नड भाषेत पाठिंबा देत असल्यामुळे महाराष्ट्राच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या ८०-९० चाहत्यांचे लक्ष तो वेधून घेत होता.

तब्बल ९०० किलोमीटरच अंतर कापून हा चाहता काल केवळ कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र सामना पाहण्यासाठी पुण्यात दाखल झाला. जेव्हा महा स्पोर्ट्सने या क्रिकेटप्रेमीशी खास संवाद साधला तेव्हा हा कुणी साधासुधा क्रिकेटप्रेमी नसून कर्नाटक रणजी संघाचे गेल्या ४-५ वर्षात तब्बल ३७ रणजी सामने प्रत्यक्ष मैदानात पाहिलेला चाहता आहे.

सुहास नायडू असे नाव असलेल्या ह्या चाहत्याचे सध्याचे वय २३ असून त्याचे डिप्लोमापर्यंतचे शिक्षण झाले आहे. बेंगलोर शहरात त्याचे एक छोटेसे हॉटेल श्रीरामपुरा भागात आहे. हे सर्व सांभाळून तो कर्नाटक रणजी संघाचे सर्व सामने प्रत्यक्ष मैदानात जाऊन पाहतो.

तुला नक्की यातून काय मिळते असे विचारले असता सुहास म्हणाला, ” माझे माझ्या राज्यावर खूप प्रेम आहे. मी माझ्या राज्यसाठी काहीही करू शकतो. आम्ही भारतीय संघात जर कर्नाटकचे खेळाडू असतील तरच सामने पाहतो. जर केएल राहुल किंवा अन्य कोणता खेळाडू बाद झाला तर आम्ही टीव्ही बंद करतो. “

“माझे वडील कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहत नाही. परंतु कर्नाटकच्या रणजी संघाचा कोणताही सामना ते न चुकता पाहतात. माझ्या वडिलांचा दुधाचा व्यवसाय आहे. त्यांनी माझ्या या क्रिकेटप्रेमाला कायम पाठिंबा दिला आहे. ” घरून चांगलाच पाठिंबा मिळत असलेला सुहास सांगतो.

भारतीय संघाचा मोठा पाठीराखा असलेला सुधीर गौतम किंवा धर्मवीर पाल यांना अनेक घटकांकडून आर्थिक पाठबळ मिळते. तसे कोणतेही पाठबळ सुहास नायडूला मिळत नाही. तो संपूर्ण भारतात बेंगलोरचे सामने पाहायला गेला आहे आणि स्वतःचा खर्च स्वतः केला आहे.

कर्नाटक संघातील कोणता खेळाडू तुझा चांगला मित्र आहे असे विचारले असता सुहास म्हणाला, ” संघातील सर्वच खेळाडू माझे खूप चांगले मित्र आहेत. आम्ही सतत संपर्कांत असतो. परंतु केएल राहुलशी चांगली मैत्री आहे. २४ ते २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या कर्नाटक विरुद्ध हैद्राबाद सामन्याला केएल राहुल संघासोबत न जाता काही कारणामुळे एक दिवस उशिरा गेला होता. तेव्हा त्याने मला फोन केला होता आणि बरोबर जाऊया असे सांगितले. तेव्हा आम्ही ३०० किलोमीटर एकत्र प्रवास केला होता आणि शिमोगा येथे रणजी सामन्यासाठी गेलो होतो. “

“मी जेव्हापासून मैदानावर जाऊन रणजी सामने पाहायला सुरुवात केलीय तेव्हापासून कर्नाटकने दोन वेळा या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. जेव्हा आम्ही २०१४-१५ वर्षात मुंबई शहरात तामिळनाडूविरुद्ध रणजी ट्रॉफी जिंकलो तेव्हा मला कर्णधार विनय कुमारने चषक हातात दिला होता. मी इतिहासातील पहिला असा फॅन आहे ज्याला हे भाग्य मिळाले. ” असेही तो आनंदाने सांगतो.

महाराष्ट्रीयन संघाच्या पाठिराख्यांबद्दल बोलताना-
आज पुण्यातील गहुंजे येथील मैदानावर सामना पाहायला जेमतेम ८०-९० प्रेक्षक उपस्थित होते. हे पाहून सुहास म्हणाला, ” आमच्याकडे बेंगलोर शहरात सामना असेल तर दोन स्टॅन्ड तर नक्की फुल असतात. ग्रामीण भागात रणजी सामना असेल तर १०-१५ हजार प्रेक्षक कुठेच गेले नाही. सामना कर्नाटक राज्यात असेल तर मला पाठिंबा देण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाही. परंतु येथे आले की वाईट वाटत. खूप कमी प्रेक्षक एवढा चांगला सामना असून आणि सुंदर मैदान असून प्रत्यक्ष मैदानात येतात.