अबब ! दोन संघ दोन दिवसांत १८ धावांवर ऑल-आऊट

धनबाद । बीसीसीआयने आयोजित केलेल्या मुलींच्या अंडर १९ क्रिकेटमध्ये बिहार संघाने दोन दिवसांत दोन संघाना १८ धावांवर ऑल-आऊट (सर्वबाद) केले.

बिहार संघाने सिक्कीम संघाविरुद्ध खेळताना ५० षटकांत ५ बाद २६५ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या सिक्कीम संघाचा संपूर्ण संघ केवळ १८ धावांत बाद झाला. त्यात बिहारच्या शिखा सिंगने १० षटकांत ८ बळी मिळवले. सिक्कीम हा सामना २४७ धावांनी पराभूत झाले.

बिहार विरुद्ध मेघालय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बिहारने ५० षटकांत ५ बाद ३८४ धावा केल्या. त्याला प्रतित्तोर देताना मेघालयचा संघ केवळ १८ धावा करून सर्वबाद झाला. हा सामनाही बिहारने ३६६ धावांनी जिंकला. यात शिखा सिंगने ३ तर कुमारीने ५ बळी घेतले.

मेघालय संघावर खरी नामुष्की त्याच्या पुढच्या सामन्यात आली जेव्हा हा संघ १७ धावांत सर्वबाद झाला. नागालँड विरुद्ध मेघालय सामन्यात नागालँड संघाच्या १४९ धावांना उत्तर देताना १७ धावांवर सर्वबाद झाला. मेघालय संघ बिहारविरुद्ध १८ तर नागालँडविरुद्ध १७ अशा छोट्या धावसंख्येवर बाद झाला.