वाढदिवस विशेष: विचित्र शैलीचा मोहंती

– आदित्य गुंड (Twitter – @AdityaGund)

भारतासारख्या देशात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला येणे, हजारोजण क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्याचा प्रयत्न करून त्यात असफल होत असताना घरच्यांचा विरोध स्वीकारून क्रिकेटची निवड करणे, १९९४ साली जिल्ह्याच्या संघातही नसताना केवळ मेहनतीच्या जोरावर २ वर्षांत रणजी आणि तिसऱ्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवणे, आपल्या पहिल्याच सामन्यात सनथ जयसूर्या, रोशन महानामा, अरविंद डिसिल्वा यांसारख्या दिग्गजांचे बळी मिळवणे, भारताच्या वेगवान गोलंदाजीचे भविष्य म्हणून लक्ष वेधून घेणे या सगळ्या गोष्टी करणारा एक खेळाडू होता. तो होता ओरिसाचा देबाशिष मोहंती.

देबाशिष अनेकांना त्याच्या गोलंदाजीपेक्षा त्याच्या गोलंदाजीच्या शैलीमुळे आजही लक्षात आहे. भारताकडून क्रिकेट खेळलेल्या गोलंदाजांमध्ये विचित्र शैलीने गोलंदाजी करणाऱ्यांची यादी करायची म्हटले तर देबाशिषचे नाव सगळ्यात आधी आठवते. बुमरा, शिविल कौशिक, केदार जाधव वगैरे खूप अलीकडचे झाले. आपला रन अप संपत आल्यावर तो हवेत उडी मारून दोन्ही हात विचित्र रीतीने फिरवी. त्यात भर म्हणून चेंडू सोडताना त्याचे डोळे इतके मोठे होत की समोरचा फलंदाज घाबरून जाई. चेंडू सोडल्यानंतरची त्याची स्थिती मात्र सुंदर असे. इतकी की आयसीसीने १९९९ च्या विश्वकरंडकाचा लोगो देबाशिषच्या गोलंदाजीच्या शैलीवरून बनवला होता.

वेगवान गोलंदाज म्हणून भारतीय संघात आलेल्या देबाशिषची सुरुवात मात्र एक फलंदाज म्हणून झाली होती. आपले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने गोलंदाजीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. कोटा सिस्टीम असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघामध्ये ओरिसाच्या खेळाडूने स्थान मिळवणे तसे अवघडच होते. आपल्या पहिल्या रणजी सामन्यात ९ बळी मिळवत त्याने जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या या कामगिरीने त्याला दुलीप करंडक आणि भारत अ संघांचे दरवाजे उघडे केले. भारत अ संघाचे तेव्हाचे प्रशिक्षक के श्रीकांत यांनी देबाशिषमधील गुणवत्ता हेरली आणि त्याला कसोटी संघामध्ये स्थान द्यावे अशी विनंती निवड समितीकडे केली. १९९६ मध्ये देशांतर्गत स्पर्धेत पदार्पण करणारा देबाशिष एका वर्षात भारतीय संघाकडून खेळणार होता. सगळे काही वेगात घडले होते. आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात देबाशिषने ४ बळी मिळवले. त्यानंतर मात्र भारताकडून तो फक्त एक कसोटी सामना खेळला. देबाशिष भारतीय संघातून क्रिकेट खेळणारा ओरिसाचा पहिला खेळाडू होता. आपल्या राज्यातला कुणीतरी भारताकडून खेळतोय याचा तिथल्या लोकांना खूप अभिमान वाटला होता. त्याचा पहिला सामना बघायला ओरिसामध्ये लोक अक्षरशः टीव्हीसमोर ठाण मांडून बसले होते.

१९९७ साली कॅनडामध्ये भारत पाकिस्तान या संघांमध्ये एक मालिका झाली होती. पाच एकदिवसीय सामन्यांची ही मालिका भारताने ४-१ अशी जिंकली होती. अनेकांना ही मालिका गांगुली मालिकावीर झाला होता म्हणून लक्षात आहे. देबाशिषने या मालिकेतूनच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि सलग तीन सामन्यात सईद अन्वरला बाद केले होते. देबाशिषच्या गोलंदाजीच्या शैलीने पाकिस्तानी फलंदाज सईद अन्वरला बराच त्रास झाला होता. याबद्दलचा किस्सा सचिनने गेल्या वर्षी एका कार्यक्रमात सांगितला होता. मालिका संपल्यावर एका कार्यक्रमात सईद अन्वरने सचिनला बाजूला घेतले आणि म्हणाला,

“यार ये तुम्हारा तो मोहंती क्या बॉलिंग करता है? कुछ पताही नही चलता. वोह ऐसे बॉल डालता है, तो कभी मुझे लगता अंदर आयेगा तो बाहर जाता है. एज लगके मै आऊट होता हूँ. छोडने का मन किया तो बॉल अंदर आता है और या तो एलबीडल्ब्यू या बोल्ड हो जाता हूँ. एक तो बॉल समझता नही और उपरसें मोहंती आके मुझे पुछता है की पता है क्या डालने वाला हूँ?

अब क्या बोलू उसे. बोलता हूँ कुछ भी डाल दे.”

देबाशिषला चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची कला अवगत होती. बाहेरच्या देशात स्विंग गोलंदाजीला पोषक वातावरण असल्याने भारताबाहेरच्या मालिकांमध्ये त्याची कामगिरी चांगली होत असे. १९९९ ला इंग्लडमध्ये झालेल्या विश्वचषकासाठी संभाव्य संघामध्ये त्याचे नाव नव्हते. मात्र इंग्लंडमधील वातावरण देबाशिषच्या गोलंदाजीला पोषक ठरेल असे वाटून निवड समितीने ऐन वेळेस त्याला संघामध्ये जागा दिली. त्यानेही निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवत ६ सामन्यांमध्ये १० बळी मिळवले. त्या विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये जवागल श्रीनाथनंतर देबाशिषचे नाव होते. आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत त्याने ४५ सामन्यांमध्ये २९ धावांमागे एक बळी मिळवत ५७ बळी मिळवले.

१९९९ चा विश्वचषक खेळून भारतात परतल्यानंतर देबाशिष एक दिवस त्याचा जुना क्लब शाहिद स्पोर्टींगच्या मैदानावर गेला. तिथल्या सगळ्यांसाठी तो त्यांचा लाडका ‘देबा भाई’ होता. त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. देबाशिषच्या गोलंदाजीची झलक पाहायला मिळेल या आशेने आलेल्या लोकांना त्याऐवजी त्याची फलंदाजी पहायला मिळाली. एक दोन चेंडू तटवल्यानंतर पुढचे बरेच चेंडू त्याने मैदानाच्या बाहेर टोलवले. देबाशिषची फलंदाजीमधील ही गुणवत्ता पाहून सारेच चकित झाले होते.

एक चांगला स्विंग गोलंदाज असूनही देबाशिषला संघातले स्थान टिकवण्यासाठी फार संधी मिळाली नाही. त्या तुलनेत मुंबईच्या अजित आगरकरला जास्त संधी मिळाल्या असे काही जाणकार लोक म्हणतात.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये देबाशिष जवळजवळ १५ वर्षे खेळला. या कालखंडात खेळलेल्या ११७ प्रथम श्रेणी सामन्यांत त्याने २१ धावांच्या सरासरीने ४१७ बळी मिळवले. यात २०००-०१ च्या हंगामात दक्षिण विभागाविरुद्धच्या सामन्यात एकाच डावात १० बळी घेण्याची किमया त्याने केली होती. दक्षिण विभागाच्या संघात त्यावेळी द्रविड, लक्ष्मण, विजय भारद्वाजसारखे खेळाडू होते हे इथे नमूद करावेसे वाटते. त्या सामन्यातले द्रविड आणि लक्ष्मणचे बळी कसे मिळवले होते हे आजही देबाशिषला ठळकपणे आठवते. भारतात प्रथम श्रेणी सामन्यांत एका डावात १० बळी मिळविण्याची कामगिरी तोपर्यंत फक्त दोन गोलंदाजांनी केली होती.

ओरिसाकडून बरीच वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर २०११ साली त्याने या संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली. २०१२ साली त्याच्या मार्गदर्शनाखाली पूर्व विभागाने पहिल्यांदा दुलीप करंडक जिंकला होता. २०१३ मध्ये अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयने नेमलेल्या तांत्रिक समितीमध्येही देबाशिषचा समावेश होता. गेल्या वर्षी सचिन आणि सोनू निगमने मिळून ‘क्रिकेटवाली बीट’ नावाचे अतिशय सुमार गाणे गायले होते. या गाण्यात सचिनने त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांची नावे घेतली होती. त्यात देबाशिषचे नाव घ्यायला तो विसरला नव्हता. देबाशिष ओरिसामध्ये अजूनही आपली लोकप्रियता राखून असल्यामुळे तिथल्या एका वेबसाईटने याची बातमीदेखील केली होती. २०१७ मध्ये देबाशिषचा सहकारी शिवसुंदर दास याने त्याकडून ओरिसा संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे आपल्या हातात घेतली.

देबाशिष सध्या भुवनेश्वर येथील नॅशनल ऍल्युमिनिअम कंपनी लिमिटेडमध्ये (नाल्को) डेप्युटी मॅनेजर म्हणून काम करतो. २०१७ मध्ये एका वाहिनीने देबाशिष एका स्टीलच्या कारखान्यामध्ये मजुरी करतो असे वृत्त देऊन खळबळ उडवली होती. यानंतर देबाशिषने सदर वाहिनीवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचे सूतोवाच केले होते.

ओरिसासारख्या छोट्या राज्याला भारतीय क्रिकेटच्या नकाशावर आणण्याची कामगिरी करणाऱ्या देबाशिषने आपण पुढच्या पिढीसाठी आदर्श घालून देणार आहोत, त्यांना धोपटमार्ग सोडून क्रिकेटमध्येही कारकीर्द करता येते हे दाखवणार आहोत याचा विचारही केला नसेल. आज 43 वा वाढदिवस साजरा करणारा देबाशिष आजही ओरिसामधील अनेक उदयोन्मूख क्रिकेट खेळाडूंसाठी हिरो आहे.

देबाशिषची क्रिकेट कारकीर्द

एकदिवसीय
सामने – ४५   बळी – ५७

कसोटी
सामने – २   बळी  – ४

प्रथम श्रेणी
सामने  – ११७   बळी  – ४१७

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

एमएस धोनी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार नाही, त्याऐवजी करणार हे काम

विंडीज दौऱ्यासाठी या दिवशी होणार टीम इंडियाची निवड

मुलाखत: प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये नवा नवीन बघायला मिळेल- नवीन कुमार