वाढदिवस विशेष: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?

दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलचा आज 34 वा वाढदिवस आहे. 6 फूच 5 इंच इतकी उंची असणाऱ्या या गोलंदाजाने त्याच्या वेगाने अनेक फलंदाजांची भंबेरी उडवली आहे.

मॉर्केलने 247 आंतरराष्ट्रीय सामन्यात 544 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. याचवर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे.

या दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाबद्दल या खास गोष्टी-

-6 आॅक्टोबर 1984 ला मॉर्ने मॉर्केलचा जन्म झाला.

-त्याचे संपूर्ण कुटुंबच क्रिकेटप्रेमी असल्याने मॉर्नेलाही क्रिकेटचा लळा लागला. त्याचे वडील अल्बर्ट मॉर्केल तसेच मलान आणि एल्बी हे दोन्ही मोठे भाऊही क्रिकेटपटू आहेत.

-त्याच्या वडीलांनी साउथर्न ट्रान्सवल कन्ट्री डीस्ट्रीक संघाकडून अ दर्जाचा सामना खेळला आहे. तर मलान या सर्वात मोठ्या भावाने दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच मधला भाऊ एल्बी हा देखील मॉर्नेप्रमाणे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाकडून खेळला आहे.

-मॉर्नेची क्रिकेट खेळण्याची शैली ही भाऊ एल्बीप्रमाणेच असून दोघेही उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतात तर डाव्या हाताने फलंदाजी करतात. पण मॉर्ने त्याच्या गोलंदाजीसाठी तर एब्ली अष्टपैलू क्षमतेसाठी ओळखला जातो.

-हे तिन्ही भाऊ घराच्या मागील अंगणात एकत्र क्रिकेट खेळायचे

-मॉर्नेमधील प्रतिभा दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज क्रिकेटपटू अॅलन बॉ़र्डर यांनी ओळखली. त्यामुळे त्यांनी त्याला मार्गदर्शन केले. तसेच त्याच्या प्रगतीकडेही ते लक्ष ठेऊन असयचे.

– 2006ला डिसेंबरमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौरा केला होता. यावेळी सराव सामन्यासाठी शेष दक्षिण आफ्रिका संघात मॉर्नेचा समावेश झाला होता. या सामन्यात सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, व्हिव्हिएस लक्ष्मण अशा फलंदाजांना गोलंदाजी करणे हा क्षण मॉर्नेने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात नर्व्हस करणारा क्षण असल्याचे त्याने सांगितले आहे.

या सामन्यात मॉर्नेने सचिन, लक्ष्मण, सेहवाग आणि एमएस धोनी यांच्या विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर त्याचा लगेचच डर्बन कसोटीमध्ये दुखापतग्रस्त डेल स्टेनच्या जागी बदली खेळाडू म्हणून राष्ट्रीय संघात समावेश झाला होता.

-मॉर्ने आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिविलियर्स हे लहानपणी प्रेटोरिया या शहरात एकमेकांचे शेजारी होते. यामुळे त्यांच्यातील मैत्रीचे नातेही दृढ आहे.

-डिसेंबर 2014 मध्ये मॉर्नेने टिव्ही नाइनची रिपोर्टर रोज केलीबरोबर विवाह केला. हे दोघे 2012 च्या दक्षिण आफ्रिकेने केलेल्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान भेटले होते.

-मॉर्ने हा ग्लेन मॅकग्राथ आणि शॉन पॉलोक या दिग्गज गोलंदाजांना आदर्श मानतो. त्याचबरोबर तो स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालचाही चाहता आहे.

-मॉ़र्नेने आयपीएलमध्ये तीन संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. यात राजस्थान रॉयल्स, दिल्ली डेअर डेविल्स आणि कोलकता नाइट रायडर्स या संघांचा समावेश आहे.

-मॉर्नेची पत्नी रोजने त्याच्या आरोग्याची काळजी घेताना त्याचे त्याच्या फिटनेसकडे लक्ष असेल यावर लक्ष दिले. त्यामुळे त्याने मांसाहार कमी केला असून शाकाहार सुरु केला आहे.

-मॉर्नेने त्याचा पहिला वनडे सामना हा आफ्रिका एकादश संघाकडून एशिया एकादश संघाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात गोलंदाजीची सुरुवात मॉर्ने आणि एल्बी या दोघाभावांनी केली होती. त्यावेळी वनडे इतिहासात दोन भावांनी संघाच्या गोलंदाजीची सुरुवात करण्याची पहिलीच वेळ होती. या सामन्यात मॉर्नेने 3 विकेट घेतल्या होत्या.

-आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मॉर्नेने 86 कसोटी सामन्यात 309 विकेट्स, 117 वनडे सामन्यात 188 विकेट्स आणि 44 टी20 सामन्यात 47 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-