वाढदिवस विशेष: भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?

आज(6 डिसेंबर) भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2012 ला कसोटी पदार्पण केल्यानंतर तो भारताच्या वनडे आणि कसोटी संघातील जवळजवळ नियमीत खेळाडू झाला आहे.

भारताकडून त्याने 39 कसोटी सामने खेळले असून यात 1395 धावा आणि 185 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 144 वनडे सामन्यात 1982 धावा आणि 169 विकेट्स, 40 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 116 धावा आणि 31 विकेट्स घेतल्या आहेत.

भारताच्या या अष्टपैलू खेळाडूबद्दल या खास गोष्टी-

-6 डिसेंबर 1988 ला जडेजाचा जन्म सौराष्ट्रमधील नवागाम खेड येथे झाला.

-त्याचे वडील अनिरुद्ध सिंग हे सिक्यूरिटी गार्ड होते, तर आई लता या नर्स होत्या.

-जडेजाच्या वडीलांची इच्छा होती की त्यांच्या मुलाने आर्मी शाळेत शिक्षण घ्यावे, पण त्याच्या आईने त्याला क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवण्यासाठी पाठिंबा दिला.

-जडेजाच्या आईचे 2005 मध्ये एका अपघातात निधन झाले. त्यावेळी त्याला मोठा धक्का बसला होता. तसेच त्याने क्रिकेटही सोडण्याचा निर्णय घेतला होता.

-जडेजाने 19 वर्षांखालील 2006 आणि 2008 असे 2 विश्वचषक खेळले आहेत. तसेच दोन्ही वेळेस भारतीय संघ अंतिम सामन्यात दाखल झाला होता. पण 2006 ला भारतीय संघ पाकिस्तान कडून अंतिम सामन्यात पराभूत झाला.

त्यावेळी 2006 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या भारतीय संघात रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा हे देखील जडेजाबरोबर होते. जडेजाने नंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2008 चा 19 वर्षांखालील विश्वचषक खेळला. या विश्वचषकात तो भारताचा उपकर्णधार होता. तसेच हा विश्वचषकही युवा भारतीय संघाने जिंकला होता.

-जडेजाला शेन वॉर्नने रॉकस्टार असे टोपननाव दिले होते. तसेच भारतीय संघातील खेळाडू त्याला जड्डू या टोपननावाने बोलवतात. तसेच एमएस धोनीने सोशल मीडियाचा वापर करुन जडेजाला सर हे टोपननाव दिले आहे.

-जडेजाला घोडस्वारीची आवड आहे. त्यामुळे त्याच्याकडे त्याच्या स्वत:चे घोडे आहेत. हे घोडे त्याच्या जमनागरजवळील फार्महाऊसवर ठेवले आहेत.

-जडेजाचे राजकोटमध्ये जड्डू फूड फिल्ड नावाचे स्वत:चे रेस्टोरंट आहे.

-जडेजा 12 या क्रमांकाला खूप लकी मानतो. त्यामुळे त्याच्या जर्सीचा क्रमांकही 12 आहे. तसेच त्याने त्याचे रेस्टोरंटही 12 डिसेंबरला सुरु केले होते. तसेच त्याचा जन्मही डिसेंबर या वर्षातील 12 व्या महिन्यात झाला आहे आणि त्याने कसोटी पदार्पणही डिसेंबर 2012 मध्ये केले आहे.

-2013 मध्ये जडेजा आयसीसीच्या वनडेत गोलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आला होता. असा पराक्रम करणारा तो कपिल देव, मनिंदर सिंग आणि अनिल कुंबळे नंतरचा चौथाच गोलंदाज होता.

-2017 मध्ये तो कसोटीतही गोलंदाजी आणि अष्टपैलू क्रमवारीत अव्वल क्रमांकावर विराजमान झाला होता.

-त्याने 2006-07 च्या मोसमात दुलिप ट्रॉफीमधून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो दुलिप ट्रॉफीमध्ये पश्चिम विभागाकडून खेळतो. तसेच रणजीमध्ये तो सौराष्ट्र संघाकडून खेळतो.

-जडेजा प्रथम श्रेणीमध्ये तीन त्रिशतके करणारा पहिला भारतीय आणि एकूण 8 वा खेळाडू आहे. त्याने पहिल्यांदा 2011 ला ओडीशा विरुद्ध 314 धावा , दुसऱ्यांदा गुजरात विरुद्ध 303 धावा आणि 2012 मध्ये तिसऱ्यांदा रेल्वेविरुद्ध 313 धावा करत तीन त्रिशतके करण्याचा पराक्रम केला.

-आयपीएलमध्ये तो पहिले तीन वर्षे राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. 2010 च्या आयपीएलमध्ये त्याच्यावर करार अनियमिततेमुळे बंदी घालण्यात आली. त्यानंतर 2011 मध्ये त्याने कोची टक्कर्स केरला संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर तो चेन्नई संघाकडून खेळत आहे. मध्ये 2016, 1017 मध्ये चेन्नईवर स्पोट फिक्सिंगप्रकरणी बंदी असल्याने तो गुजरात लायन्स संघाकडून खेळला.

महत्त्वाच्या बातम्या:

आयपीएल चाहत्यांना मोठा धक्का, २०१९च्या आयपीएलमध्ये दिसणार नाही ही ऑस्ट्रेलियाची स्फोटक जोडी

आयपीएल २०१९च्या लिलावासाठी युवराजची मूळ किंमत मागील वर्षी पेक्षा तब्बल एक कोटीने कमी!!

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: चेतेश्वर पुजाराच्या शतकाने राखली भारताची लाज